बीड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

गेवराई - बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. यामध्ये गेवराई येथील एका 22 वर्षीय युवकाने सावकारांच्या मारहाणीला व त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.2) सकाळी सहा वाजता शहरातील साठेनगरात उघडकीस आली. शेख आसेफ शेख इस्माईल असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, मजुरी करून तो उदरनिर्वाह करत होता.

गढी येथे एका 25 वर्षांच्या विवाहित शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. अनिल बबनराव सिरसट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. दरम्यान, मृताची आई पंढरपूर यात्रेसाठी गेल्या आहेत; तर पत्नी स्वयंपाकासाठी सासऱ्याच्या घरी गेल्या होत्या. घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेतला. अनिल यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. गेवराईचे पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत, एन. ए. फड यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: beed marathwada two farmer suicide