बीड खून प्रकरण - तिघांवर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार, १२ आरोपींना कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

बीड जिल्ह्यात शेतीच्या वादातून तिघांचे खून झाले. यातील मृतांवर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले असून, पीडित कुटुंबीयांना २८ लाख ७५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेने बीड जिल्हा हादरून गेला आहे.
 

केज (जि. बीड) - तालुक्यातील मांगवडगाव येथील शेतीच्या वादातून हत्या झालेल्या पवार कुटुंबातील तिघांवर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १५) कळंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर तब्बल २४ तासांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील १२ आरोपींना न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

शासनाने पीडित कुटुंबीयांना २८ लाख ७५ हजार रुपयांची मदत करून त्यातील पहिल्या टप्प्याचे धनादेशही दिले. तालुक्यातील मांगवडगाव येथील पवार व निंबाळकर या दोन कुटुंबांमधील शेतजमिनीच्या वादातून बुधवारी (ता. १३) रात्री उशिरा बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार व संजय बाबू पवार या तिघा बापलेकांची हत्या झाली. तर, एक महिला जखमी झाली. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात धनराज बाबू पवार यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरोधात गुन्हा नोंद झाला.

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

दरम्यान, गुरुवारी मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाली. मात्र, विविध मागण्यांसाठी मृतदेह ताब्यात घेतले नव्हते. शुक्रवारी अधिकाऱ्यांची मध्यस्थी व वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कानंतर मृतदेह ताब्यात घेऊन कळंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व १२ आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना व जखमींना शासनातर्फे २८ लाख ७५ हजार रुपयांची मदत जाहीर करून त्यातील पहिल्या टप्प्यातील १३ लाख ३७ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed murder case, 12 accused remanded in custody