शेतकऱ्याला चिरडलेल्या हायवाला पकडायला लागले तब्बल 6 दिवस; पोलिसांच्या तपासावर संशय

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

शेतकरी रूस्तुम मते यास अवैध वाळू उपसा करणाऱ्या हायवाने चिरडले. यात त्यांच्या शरीराचे दोन तुकडे होऊन जागेवरच मृत्यू झाला.

बीड : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने शेतकऱ्याला चिरडल्यानंतर 24 तासांत हायवा पकडून गुन्हा नोंद करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या यंत्रणेला हायवा पकडायला सहावा दिवस उजाडला. शनिवारी (ता. 9) हायवा पकडला असला तरी हायवाचा मालक कोण हे तपास यंत्रणेने नेहमीप्रमाणे गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे नेहमीच संशयात असलेल्या यंत्रणेबद्दल अधिकच संशय वाढला आहे.

सोमवारी (ता. 4) गंगावाडी (ता. गेवराई) येथील शेतकरी रूस्तुम मते यास अवैध वाळू उपसा करणाऱ्या हायवाने चिरडले. यात त्यांच्या शरीराचे दोन तुकडे होऊन जागेवरच मृत्यू झाला. हायवा चालक, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाईसाठी गंगावाडी येथील ग्रामस्थांनी तब्बल सात तास ठिय्या आंदोलन केले. उशिरापर्यंत मृतदेहही ताब्यात घेतला नव्हता. लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

अर्ध्यावरती डाव मोडला... अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

दरम्यान घटनेच्या सहाव्या दिवसी संशयित एक हायवा व हायवा चालक पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे घटनेचे तपासप्रमुख युवराज टाकसाळ यांनी सांगितले. मात्र, हायवाचा मालक कोण हे उघड करण्यास यंत्रणेकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे तपासाबद्दल ग्रामस्थांकडून संशय व्यक्त होत आहे.

हेही वाचा - हिंगोलीत कोरोना लसीची रंगीत तालिम पुर्ण 

चालकांवर कारवाया; मालकांची नावे नाहीत-
बीड, गेवराई व माजलगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक व उपशाच्या प्रकारांनी उच्छाद मांडला आहे. गंगावाडीत शेतकऱ्याला हायवाने चिरडून त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. या प्रकाराने महसूल व पोलिस यंत्रणेची इभ्रत चव्हाट्यावर आली. दरम्यान, महसूल व पोलिसांकडून अधुनमधून लुटूपुटूच्या कारवाया सुरु असतात. मात्र, कारवाया केवळ चालकांवर केल्या जातात. हायवाच्या मालकांची नावे मात्र गुपित ठेवली जातात. या तीनही तालुक्यांत अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने बड्या धेंडांची आहेत. मात्र, हप्तेखोर यंत्रणा मालकांची नावे गुपित ठेवते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed news 6 days to catch the hywa Case of crushing the farmer by hywa