
फारुक पटेल राष्ट्रवादी म्हणजे आघाडीतून विजयी झालेले असले तरी अलीकडे ते संदीप क्षीरसागर यांच्यापासून दुरावलेले आहेत हे विशेष.
बीड : नगर पालिका निवडणुकीत काकांविरोधात रणशिंग फुंकत त्यांना जेरीस आणणाऱ्या आ. संदीप क्षीरसागर यांची काकू - नाना आघाडी नगर पालिकेत आता घायाळ झाली का, असा प्रश्न आता पडत आहे. शुक्रवारी (ता. २२) झालेल्या विषय समित्यांच्या निवडीवेळी आघाडीकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. परिणामी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्याच गटाकडे सर्व समित्या गेल्या. महिनाभरापूर्वी आघाडीतून नगराध्यक्षांकडे प्रवेश करणाऱ्या अश्विनी गुंजाळ यांनाही महिला व बालकल्याण समितीची बक्षिशी मिळाली.
यासह सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापतिपद विनोद मुळूक, पाणीपुरवठा समितीचे सभापतिपद शेख इलियास, अर्थ व नियोजन समितीचे सभापतिपद सुशिला नाईकवाडे यांच्याकडे, विद्युत समितीचे सभापतिपद सुभद्रा पिंगळे, तर शिक्षण व क्रीडा समितीची माळ भास्कर जाधव आणि स्थायी समितीमध्ये विकास जोगदंड, शेख मोहंमद खालेद व फारुख पटेल यांची निवड झाली.
फारुक पटेल राष्ट्रवादी म्हणजे आघाडीतून विजयी झालेले असले तरी अलीकडे ते संदीप क्षीरसागर यांच्यापासून दुरावलेले आहेत हे विशेष. विषय समितीच्या निवडीसाठी शुक्रवारी पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी बैठक घेतली. मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी काम पाहिले. विरोधी गटाकडून एकही अर्ज न आल्याने सर्व निवडी अविरोध झाल्या. दरम्यान, काकू नाना विकास आघाडी तथा राष्ट्रवादीकडून एकही अर्ज न येणे हा चार वर्षांतील मोठा राजकीय बदल मानला जात आहे.
कारण चार वर्षांपूर्वी या निवडणुकीच्या निमित्तानेच संदीप क्षीरसागर यांनी दोन्ही काकांना (जयदत्त क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर) यांना आव्हान दिले होते. त्यावेळी डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. तर, पालिकेच्या उमेदवारीचे बी फॉर्म जयदत्त क्षीरसागर यांच्या मर्जीने भेटल्याने संदीप क्षीरसागर यांनी काकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली. त्यांनी डॉ. क्षीरसागर यांच्या विरोधात वडील रवींद्र क्षीरसागर यांना रिंगणात उतरविले होते. नगराध्यक्षपदी जिंकता आले असले तरी आघाडीने त्यावेळी काकांना चांगलेच जेरीस आणले होते.
पुतणे कोणत्या शस्त्रसाठ्याचा वापर करणार?
त्यावेळच्या एमआयएमला गळाला लाऊन उपनगराध्यक्षांसह पालिकेतील निम्मी सत्ता मिळविली होती. मात्र, हळूहळू पुलाखालून पाणी वाहत गेले. एमआयएमनंतर आघाडीतील काही नगरसेवकही आता नगराध्यक्षांच्या तंबूत गेले आहेत. आता वर्षभरावर निवडणूक आलेली असताना आघाडीने असे शस्त्र म्यान करण्याने राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण, आव्हान देतेवेळी ज्या शस्त्रांनी पुतण्याने काकांना जेरीस आणले आता तीच शस्त्रे हळूहळू काकांनी हातात घेतली आहेत. आता वर्षभराने पुन्हा होणाऱ्या युद्धात पुतणे कोणत्या शस्त्रसाठ्याचा वापर करणार हे पाहावे लागणार आहे.
Edited - Ganesh Pitekar