चार क्विंटल गांजासह दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

बीड - हैदराबादहून औरंगाबादकडे दहा टायर ट्रकमधून जाणारा चार क्विंटल गांजा शनिवारी (ता. 20) पकडला. यामध्ये दोन आरोपींसह 10 टायरचा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री आठ वाजता तालुक्‍यातील मांजरसुंबा येथे ही कारवाई करण्यात आली. 

बीड - हैदराबादहून औरंगाबादकडे दहा टायर ट्रकमधून जाणारा चार क्विंटल गांजा शनिवारी (ता. 20) पकडला. यामध्ये दोन आरोपींसह 10 टायरचा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री आठ वाजता तालुक्‍यातील मांजरसुंबा येथे ही कारवाई करण्यात आली. 

हैदराबादहून एका दहा टायरच्या ट्रकमधून (एपी 16 टीवाय 1206) औरंगाबादकडे गांजा नेला जाणार असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना दिली. अधीक्षक श्रीधर यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती दिली. यानंतर गुन्हे शाखेचे पथक मांजरसुंब्याकडे रवाना केले. ट्रक केजहून पुढे निघाल्याचे समजताच पथकाने मांजरसुंबा येथेच सापळा लावला. रात्री आठ वाजता ट्रक येताच पोलिस पथकाने ट्रकला जीप आडवी लावली व ट्रक अडविला. तपासणी केली असता यामध्ये गांजा असल्याचे आढळले. रात्री उशिरापर्यंत ट्रकमधून गांजा बाहेर काढण्याचे काम सुरू होते. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्‍याम पाळवदे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, परमेश्वर सानप, नरेंद्र बांगर, रवी गोले, सखाराम सारूक, रूपसिंग राठोड यांचा सहभाग होता. दरम्यान, या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली असून हा गांजा नेमका कोठे जाणार होता? याचा तपास घेतला जात असल्याचे पाळवदे म्हणाले. 

तसेच, हैदराबादहून ट्रक निघाल्यापासून हा गांजा अनेक ठिकाणी विक्री केल्याचा संशय आहे. बीड, औरंगाबादला गांजा देण्याचा त्यांचा "प्लॅन' असावा, असा पोलिसांचा संशय आहे. ट्रकमधील मुख्य साहित्य उस्मानाबादमध्ये उतरविल्याचेही पोलिसांनी सांगितले. या गांजाची "साखळी' बीडमध्ये पोहचत असल्याचाही संशय असून त्यादृष्टीनेही तपास करण्यात येणार आहे. 

Web Title: beed news crime