१४४ पैकी ७७ प्रकल्प भरले काठोकाठ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

बीड - जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९० टक्के पाऊस झाला आहे. अद्यापही परतीच्या मोठ्या पावसाची शक्‍यता असल्याने गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही पाऊस वार्षिक सरासरी ओलांडण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये वाढ झालेली असून १४४ प्रकल्पांपैकी ७७ प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. यामध्ये मांजरा या मोठ्या धरणासह १५ मध्यम, तर ६२ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

बीड - जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९० टक्के पाऊस झाला आहे. अद्यापही परतीच्या मोठ्या पावसाची शक्‍यता असल्याने गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही पाऊस वार्षिक सरासरी ओलांडण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये वाढ झालेली असून १४४ प्रकल्पांपैकी ७७ प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. यामध्ये मांजरा या मोठ्या धरणासह १५ मध्यम, तर ६२ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

जिल्ह्यात माजलगाव व मांजरा हे दोन मोठे, १६ मध्यम, तर १२६ लघु प्रकल्प असे एकूण १४४ प्रकल्प आहेत. यावर्षी आतापर्यंत सरासरी ६६६ मिलिमीटर या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६००.२० मिलिमीटर म्हणजेच ९०.०७ टक्के पाऊस झाला आहे. हा पाऊस एक जून ते २५ सप्टेंबरच्या सरासरीच्या तुलनेत ०४.२२ टक्के इतका आहे. या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालू महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहिल्या. यामुळे जलसाठ्यांमध्ये पाण्याची आवक वाढत गेली. उपयुक्त साठ्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सध्या ७६.४५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या माजलगाव प्रकल्पात २१३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून हे धरण ६८.२७ टक्के भरले आहे. याशिवाय मांजरा हे दुसरे मोठे धरणही काठोकाठ भरले असून या धरणाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सोडण्याची वेळ धरण प्रशासनावर आली होती. आजघडीला जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला असून एकही प्रकल्प कोरडा राहिलेला नाही. सध्या केवळ १४ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. आतापर्यंत झालेल्या मुबलक पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला असून शेतीला सिंचनासाठी पाणी सोडण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

परतीच्या पावसात बदलणार चित्र 
जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्याच्या उत्तरार्धात चांगला पाऊस पडतो. गेल्या काही वर्षांपासून हेच चित्र कायम आहे.  गतवर्षीही उत्तरार्धात दोनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने वार्षिक सरासरी ओलांडत १२५ टक्‍क्‍यांवर पाऊस झाला होता. 
यावर्षी आतापर्यंत ९० टक्के पाऊस झाला असून परतीचा पाऊसही दमदार होण्याची अपेक्षा असल्याने यावर्षीही पाऊस वार्षिक सरासरी ओलांडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परतीचा मोठा पाऊस झाल्यास पुन्हा नद्या वाहणार असून उर्वरित प्रकल्पही तुडुंब भरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

हे प्रकल्प भरले तुडुंब
मांजरा या मोठ्या प्रकल्पासह बिंदुसरा, सिंदफणा, महासांगवी, मेहकरी, कडा, कडी, रूटी, तलवार, कांबळी, वाण, सरस्वती, कुंडलिका, वाघेबाभूळगाव, बोधेगाव हे १५ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. याशिवाय वंजारवाडी, कटवट, खटकाळी, शिवणी, जरूड, डोकेवाडा, डोमरी, सुलतानपूर, मस्सावाडी, जुजगव्हाण, गोलंग्री, लोकरवाडी, वडगाव-भंडारवाडी, करचुंडी, मोरझलवाडी, पिंपळवंडी खोपटी, धनगर जवळका, पाचंग्री, भायाळा, दासखेड, मुंगेवाडी, इंचरणा, लांबरवाडी, सौताडा, भुरेवाडी, वसंतवाडी, वेलतुरी, पांढरी, ब्रह्मगाव, किन्ही, चोभा निमगाव, वडगाव, बेलगाव, पिंपळा, मातकुळी, सिद्धेवाडी, बळेवाडी, सुलेमान देवळा, पांढरी, जळगाव, मस्साजोग, घागरवाडा, नाहोली, जाधव जवळा, जिवाचीवाडी, लिंबाचीवाडी-१, लिंबाचीवाडी-२, देठेवाडी, आमला, आवरगाव, भोगलवाडी, धारूर, खानापूर, चिखलबीड, साळिंबा, चारदरी, निळकंठेश्वर, चनई, घाटनांदूर, कन्हेरवाडी, करेवाडी, मोहा हे लघु प्रकल्पही तुडुंब भरले आहेत.

फळबागांसह खरीप पिकांना दिलासा
जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मोसंबी, दाळिंब आदी फळबागांसह खरिपातील कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मका आदी पिकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय यावर्षी उसाचे क्षेत्र वाढले असून या उसालाही सततच्या पावसाचा फायदा होणार आहे.

Web Title: beed news dam manjra dam