ऑफलाइनमुळे गती वाढली अन्‌ मुदत संपत आल्याने गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

बीड - ऑनलाइन पीकविमा भरण्याच्या पद्धतीमुळे शेतकरी आणि बॅंकांची त्रेढातिरपीट उडविणाऱ्या निर्णयामुळे मागचे आठ दिवस विमा भरण्याची गती खूपच मंद होती; पण जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी ऑफलाइन विमा स्वीकारण्याचे आदेश दिल्याने शनिवारपासून (ता. २९) विमा भरण्याची गती वाढली आहे; मात्र शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने बॅंकांसमोर शेतकऱ्यांची तोबा गर्दी, एका शेतकऱ्याचा यामुळे गेलेला जीव, रास्ता रोको आणि शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण अशा अनेक घटना शनिवारी विमा भरण्यावरून जिल्ह्यात घडल्या.

यंदा पीकविमा ऑनलाइन भरण्याची नवीन पद्धत लागू करण्यात आली; मात्र यासाठीच्या वेबसाईटचे सर्व्हर अद्यापही डाऊन आहे. त्यामुळे विमा भरण्याची गती अत्यंत मंद होती. मुदत संपल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होते. दरम्यान, शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी ऑफलाइन पीकविमा भरून घेण्याच्या सूचना बॅंकांना दिल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी बॅंका केवळ कर्जदार शेतकऱ्यांचाच विमा भरून घेत आहेत. त्यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रावर जाऊनच विमा भरावा लागत आहे; पण या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे. मुदत संपत आल्याने विमा भरता येतो की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. यामुळे पहाटेपासूनच बॅंकांसमोर रांगा लागल्याचे चित्र जिल्हाभर पाहायला मिळत आहे. बॅंका उघडताच शेतकऱ्यांच्या गर्दीचे लोंढे तुटून पडत आहेत. यातून पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाणीचा प्रकार माजलगावात घडला. तर अंबाजोगाई तालुक्‍यातील जोडवाडी येथील शेतकऱ्याला विमा भरण्यासाठी आपला जीव गमवावा लागला. मंचक इंगळे हे शेतकरी दुचाकीवर मागे बसून घाटनांदूरला जाताना त्यांचा अपघात झाला. कडा, आडस, सिरसाळा येथे गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. या ठिकाणीही शेतकऱ्यांना पोलिसांनी काठ्या मारल्याच्या आरोप आहे. आडस आणि माजलगाव तालुक्‍यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांना विमा भरून घेण्यासाठी रास्ता रोकोही केला. शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे बॅंक अधिकारीही धास्तावले असून बहुतेक बॅंकांनी पोलिस संरक्षणाची मागणीही केली असून काही ठिकाणी पोलिस संरक्षणात काम सुरू आहे. 

ऑफलाइन विमा स्वीकारण्यास सुरू केल्यामुळे गती वाढली आहे. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा. मागच्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली तर शेवटच्या दोन-तीन दिवसांतच विमा भरून झालेला आहे. सर्व बॅंकांना सूचना दिलेल्या आहेत; तसेच सेवा केंद्रांवरूनही विमा भरून घेतला जात असल्याने एकही शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहणार नाही.
- चंद्रकांत सूर्यवंशी,  निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

Web Title: beed news farmer Insurance