६.४३ लाख शेतकऱ्यांनी भरला ५५ कोटींचा विमा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

बीड - गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी ५७ कोटी रुपयांचा पीकविमा उतरविला होता. यावर्षी पेरणीनंतरपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने खरीप पिके सुकू लागली असून पिके हातची जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी तब्बल ६ लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी सुमारे ५५ कोटींचा पीकविमा उतरविला आहे. एकीकडे पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गतवर्षीपेक्षा सव्वा लाखाने वाढली असली तरी दुसरीकडे प्रिमीअमची रक्कम मात्र गतवर्षीपेक्षाही कमी झाली आहे.

बीड - गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी ५७ कोटी रुपयांचा पीकविमा उतरविला होता. यावर्षी पेरणीनंतरपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने खरीप पिके सुकू लागली असून पिके हातची जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी तब्बल ६ लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी सुमारे ५५ कोटींचा पीकविमा उतरविला आहे. एकीकडे पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गतवर्षीपेक्षा सव्वा लाखाने वाढली असली तरी दुसरीकडे प्रिमीअमची रक्कम मात्र गतवर्षीपेक्षाही कमी झाली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी केवळ कापसाऐवजी इतर पिकांचाही विमा मोठ्या प्रमाणात उतरविल्याने प्रिमीअमची रक्कम कमी झाल्याचे निरीक्षण अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी नोंदविले आहे.

गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त म्हणजेच तब्बल १२५ टक्के इतका पाऊस झाला होता. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षी जिल्ह्यातील ५ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी ५७ कोटींचा पीकविमा भरला होता. यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाला. यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा पेरण्याही लवकर उरकण्यात आल्या. मात्र पिकांची उगवण झाल्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला असून बहुतांश भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. पिकांची परिस्थिती वाईट असल्याने यावर्षी पीकविमा उतरविण्याला शेतकऱ्यांनी पसंती देत आपली पिके संरक्षित करून घेतली.

यावर्षी राष्ट्रीयीकृत बॅंक तसेच जिल्हा बॅंकेत मिळून ४ लाख ४३ हजार २०४ शेतकऱ्यांनी एकूण ३४ कोटी ९८ लक्ष ६९ हजारांचा पीकविमा भरला. याशिवाय ई-महासेवा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने १ लाख ८७ हजार शेतकऱ्यांनी तर  ५ ऑगस्टला ई-महासेवा केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने १२ हजार ९११ शेतकऱ्यांनी जवळपास २० कोटींचा पीकविमा भरला आहे. जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पिकांसाठी एकूण ६ लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी जवळपास ५५ कोटींचा पीकविमा उतरविला आहे. बॅंकांमध्ये भरलेल्या पीकविम्याचा विचार केल्यास सर्वाधिक १३ कोटी १३ लाख रुपयांचा पीकविमा जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमध्ये भरण्यात आला आहे.

बॅंकांमध्ये भरला ३५ कोटींचा पीकविमा
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये १३ कोटी १३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत ९ कोटी ४५ लाख रुपये, स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ८ कोटी ६२ लाख रुपये, बॅंक ऑफ बडोदामध्ये ४६ लाख, बॅंक ऑफ इंडियामध्ये ३७ लाख, बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये १ कोटी ९ लाख, कॅनरा बॅंकेत ७ लाख, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये ५८ लाख, देना बॅंकेत ९ लाख, आयडीबीआयमध्ये २९ लाख, पंजाब नॅशनल बॅंकेत १ लाख, सिंडीकेट बॅंकेत ३ लाख, युको बॅंकेत २ लाख, युनायटेड बॅंकेत १३ लाख, विजया बॅंकेत १८ लाख, ॲक्‍सिस बॅंकेत अडीच लाख, एचडीएफसी बॅंकेत २२ लाख तर आयसीआयसीआय बॅंकेत १५ लाख रुपयांचा असा बॅंकांमध्ये एकूण ३५ कोटींचा पीकविमा भरण्यात आला आहे.

Web Title: beed news farmer Insurance