esakal | लॉकडाऊन करायचे का? निर्णय जनतेच्याच हाती
sakal

बोलून बातमी शोधा

SAKAL (88).jpg

जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयांत १५०० ऑक्सिजन व २५० आयसीयू बेड तयार आहेत. जिल्हा रुग्णालयात ३०० कोरोनाग्रस्तांवर उपचाराची सुविधा असून आता बीडचे कोविड केअर सेंटरची क्षमता १०० केली असून आता १५० पर्यंत वाढविणार आहोत.

लॉकडाऊन करायचे का? निर्णय जनतेच्याच हाती

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : व्यापारी, व्यावसायिकांसह अगदी शेतकऱ्यांनाही लॉकडाऊनच्या झळा बसल्या आहेत. सर्वच घटकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मात्र, भविष्यात जिल्ह्यात लॉकडाऊन करायचे का? कधी करायचे? याचा निर्णय सर्वस्वी लोकांवर आणि त्यांच्या वागण्यावर अवलंबून आहे. लोकांनी चांगली काळजी घेतली आणि रुग्णसंख्या आटोक्यात राहिली तर लॉकडाऊन करावेही लागणार नाही. अन्यथा शासनाच्या निर्देशानुसार तसा निर्णय देखील घ्यावा लागेल, असे मत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी व्यक्त केले.


त्यामुळे लोकांनी, व्यावसायिकांनी अधिक काळजी घ्यावी, गर्दी टाळावी. सुरक्षेच्या उपाययोजना अधिक आखाव्यात असे आवाहनही श्री. जगताप यांनी केले. मधल्या काळात आटोक्यात आलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. पुन्हा एकदा ५० वरून शंभर आणि गुरुवारी (ता. ११) तर नव्या रुग्णांचा आकडा तब्बल १८५ एवढा वाढला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी, उपाय योजनांबाबत श्री. जगताप यांच्याशी संवाद साधला. सद्यःस्थितीतील यंत्रणा, वाढत्या रुग्णसंख्येवरील उपचाराचे नियोजन आदी लेखाजोखाच मांडला. आतापर्यंत साधारण २६ हजारांवर लोकांना कोरोना विरुद्धची लस टोचली आहे. व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट मोहीम हाती घेतली आहे. बीडसह तालुक्यांच्या ठिकाणी यासाठी नियोजन केले आहे. उपचारासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करत काळजी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


खाटांची क्षमता वाढविली
अंबाजोगाईच्या विषाणू तपासणी प्रयोगशाळा दोन शिफ्टवरुन तीन शिफ्टमध्ये सुरु केली आहे. पाच प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तीन डेटा एंट्री ऑपरेटर वाढविले आहेत. जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयांत १५०० ऑक्सिजन व २५० आयसीयू बेड तयार आहेत. जिल्हा रुग्णालयात ३०० कोरोनाग्रस्तांवर उपचाराची सुविधा असून आता बीडचे कोविड केअर सेंटरची क्षमता १०० केली असून आता १५० पर्यंत वाढविणार आहोत. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातही शंभरावर बेड तयार आहेत. लोखंडीच्या कोविड हॉस्पीटलची क्षमता ३० वरून ७० केली आहे. क्षमता असून परळीत ३० खाटांचे, माजलगावला ५० खाटांचे, केजला तीस खाटांचे कोविड केअर पुन्हा सुरु होत आहे तर आष्टीचे ३० खाटांवरून ६० खाटांची क्षमता वाढविली जात आहे. ऑक्सिजनची उपलब्धताही पुरेशी आहे. सध्या बीडमध्ये दोन खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून आणखी दोन रुग्णालयांच्या अधिग्रहणाचीही प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली.


लोकांनी अधिक काळजी घेतली तर...
शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन सुरु झाले आहे. जिल्ह्याबाबत विचारले असता श्री. जगताप म्हणाले, व्यापारी, शेतकरी आणि सर्वच घटकांना लॉकडाऊनने होरपळून टाकले आहे. कोणालाच लॉकडाऊन परवडणारे नाही. पण, लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सर्वस्वी लोकांच्या हाती आहे. लोकांनी अधिक काळजी घेतली आणि रुग्णसंख्या आटोक्यात राहिली तर कदाचित ही वेळ येणार नाही. पण, लोकांचे वागणे असेच राहिले तर शासन निर्देशानुसार तसा निर्णय देखील घ्यावा लागू शकतो असेही श्री. जगताप म्हणाले.


म्हणून वाढला कोरोना...
जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गित्ते म्हणाले, सध्या ५५६ रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यातील १०५ रुग्ण ऑक्सीजन सपोर्टवर असून पैकी आठ रुग्णांना व्हेंटीलेटर्स लावलेले आहे. गरजेनुसार नियमाने मनुष्यबळ पुन्हा वाढविण्यात येत आहे. मधल्या काळात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने लोक सामान्य वागले, काळजी कमी घेतल्याने आता रुग्ण सापडत आहेत. गेवराई, पाटोदा व शिरुरच्या रुग्णांची सोय बीडला केली आहे. रुग्णांच्या वाहतुकीसाठी ७४ रुग्णवाहिका कार्यरत आहेत.होम आयसोलेशन मधील रुग्ण इकडे तिकडे फिरत असल्याचे आढळल्याने आता वरिष्ठांच्या सूचनेनुसार होम आयसोलेशन बंद केल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar

loading image