लिंगबदलामुळे "त्या' पोलिस महिलेची नोकरी धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

बीड - शरीरात जाणवणाऱ्या बदलांमुळे बीड जिल्हा पोलिस दलातील एका 29 वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेची परवानगी मागितली आहे. मात्र, लिंगबदलामुळे महिलेचा पुरुष होणार असून, महिला आरक्षणामुळे मिळालेली नोकरी जाण्याचा धोका आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलिस दलात चर्चा होत आहे. 

बीड - शरीरात जाणवणाऱ्या बदलांमुळे बीड जिल्हा पोलिस दलातील एका 29 वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेची परवानगी मागितली आहे. मात्र, लिंगबदलामुळे महिलेचा पुरुष होणार असून, महिला आरक्षणामुळे मिळालेली नोकरी जाण्याचा धोका आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलिस दलात चर्चा होत आहे. 

जिल्हा पोलिस दलातील 29 वर्षीय महिला पोलिस शिपायाने लिंगबदलाची परवानगी द्यावी, असा अर्ज वरिष्ठांना केला आहे. शरीरात जाणवणाऱ्या बदलामुळे संबंधिताने केलेला अर्ज सध्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असला, तरी यामुळे अनेक प्रश्‍न समोर आले आहेत. ही महिला 2008-09 मध्ये बीड जिल्हा पोलिस दलात शिपाई म्हणून महिलेच्या आरक्षणातून भरती झाली. तिने लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी रजा आणि परवानगी मागितली असून मुंबईच्या एका रुग्णालयात प्राथमिक तपासण्याही केल्या आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिचा पुरुष होईल आणि त्यामुळे तिच्या नोकरीवर गदा येण्याची भीतीही निर्माण झाली आहे. कारण, ती महिला आरक्षणातून नोकरीला लागलेली असल्याने तिचे आरक्षण रद्द होणार आहे. 

घरातील ती एकटीच कर्ती आणि कमावती आहे. दरम्यान, लिंगबदल शस्त्रक्रिया महागडी असून, त्यासाठीच्या चाचण्या वर्षभर कराव्या लागतात. या शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ, सर्जन, मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे. या सर्वांच्या निगराणीखाली ही शस्त्रक्रिया होते; तसेच, शस्त्रक्रियेनंतर काही महिने तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला व तपासण्या करणे आवश्‍यक आहे. 

चोहेबाजूंनी अडचण 
या महिला शिपायाच्या शरीरातील बदलामुळे तिला लिंगबदल करणे आवश्‍यक आहे. ही शस्त्रक्रियाही खर्चिक आहे. शिवाय लिंगबदलामुळे तिचे नोकरीतील आरक्षण रद्द होऊन नोकरी जाण्याची भीतीही आहे. त्यामुळे अनेक पेचात ही महिला शिपाई अडकली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beed news police women gender sexuality jobs