बीडमधील भविष्यातील राजकारणाचे ‘नियोजन’!

रविवार, 27 ऑगस्ट 2017

बीड जिल्हा नियोजन समिती निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेत्या, पालकमंत्री पंकजा मुंडे भविष्याच्या राजकारणाचेही नियोजन करीत असल्याचे दिसून येत आहे. ‘आत्ममग्न’, ‘सुस्त’ सरदारांच्या भरवशावर आगामी निवडणुकीत झेंडा फडकणे कठीण असल्याचे उमगल्याने हळूहळू त्या एकेका सरदारांना पर्याय शोधत आहेत. ‘राष्ट्रवादी’पासून अलिप्त असलेल्या मुंदडा गटाने या निवडणुकीसाठी भाजप गटातून भरलेली उमेदवारी त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे...

बीड जिल्हा नियोजन समितीच्या ३२ जागांची निवड होणार आहे. संख्याबळानुसार समितीवर २२, तर राष्ट्रवादीचे १० सदस्य असू शकतील. या फॉर्म्युल्यानुसार अविरोध निवडीचे प्रयत्न झाले; पण ‘मोजक्‍यांनीच पदे’ घेण्याच्या राष्ट्रवादीतील सवईमुळे पक्षांतर्गतच ओढाताणीतून निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत. त्यातच पक्षाचे विधिमंडळ उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर आणि नंदकिशोर मुंदडा या नेत्यांनी ‘पक्ष सोडून आपल्याला रान मोकळे करावे’ यासाठी पक्षातल्या दुसऱ्या गटाच्या खेळ्या सुरूच आहेत. त्याचाच भाग म्हणून या निवडणूक प्रक्रियेतून या दोघांना वगळले; पण भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी भविष्याचा वेध घेऊन मुंदडांना हेरले व त्यांच्या गटाचे अर्ज भाजप गटातून भरून घेण्यास सांगितल्याची चर्चा आहे.

मुंदडा गटाचे भाजप गटातून भरलेले अर्ज केवळ जिल्हा नियोजन समिती जिंकण्याचे नियोजन नसून ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची पायाभरणीही असल्याचे मानले जाते. सध्या केज मतदारसंघाच्या भाजपच्या ‘सरदारांना’ घेऊन आगामी विधानसभेचे रणांगण लढणे मोठे दिव्य असल्याची जाणीव पंकजा मुंडे यांना निश्‍चितच आहे. मागच्या निवडणुकीत विजयासाठी ‘जिवाचे रान’ करणाऱ्या मुंडेनिष्ठांसह रमेश आडसकर गटाला आमदार संगीता ठोंबरेकंडून कायम विरोध असतो. तर आमदार निधीची कामे वाटपासाठीच्या या आमदारांच्या ‘निकषांची’ मतदारसंघात चवीने चर्चा असते. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपकडून विद्यमान आमदार उमेदवार असतील तर मूळ भाजप, मुंडेनिष्ठ आणि आडसकर गटाकडून विरोध होणार हे निश्‍चित मानले जाते. त्यामुळेच नियोजन समितीच्या निमित्ताने आगामी निवडणुकांसाठी पंकजा मुंडेंकडून हा शोधलेला पर्याय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

केज मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांची राजकीय सुरवात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या साथीने भाजपमधूनच सुरू झाली. दोनवेळा भाजप, तीनवेळा राष्ट्रवादीतून प्रतिनिधित्व करणाऱ्या विमल मुंदडा नेहमी मोठ्या मतांनीच विजयी झाल्या. भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही मुंडे-मुंदडा घराण्यांमधील संबंध टिकून राहिले. सद्यःस्थितीत अंतर्गत कुरघोड्यांमुळे जरी नंदकिशोर मुंदडा राष्ट्रवादीपासून अलिप्त असले, तरी त्यांनाच उमेदवारी मिळेल, असा त्यांच्या समर्थकांचा विश्‍वास आहे. त्यामुळे मुंदडांनी इतर पक्षाचा झेंडा हाती घेण्याची घाई करण्याऐवजी ‘वेट अँड वॉच’चा मंत्र जपत ‘अक्षय मुंदडा मित्रमंडळ’ आणि ‘विमल मुंदडा विचार मंच’चे झेंडे हाती घेतले आहेत. सध्या ना मुंदडांना घाई, ना भाजपला; पण आगामी निवडणुकीसाठी मुंदडांचा राजकीय फायदा होऊ शकतो, हे लक्षात आल्याने भाजपकडून त्यांच्यावर आतापासूनच जाळे फेकले आहे. कारण, पुनर्रचनेत केजमधून परळीत गेलेल्या भागात मुंदडांना मानणारा मोठा वर्ग असून त्याचा फायदा होईल, असे गणित मांडले जाते. मागच्या निवडणुकीत त्यांच्या स्नुषा नमिता मुंदडा पराभूत झाल्या असल्या तरी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मुंदडांची मतदारसंघ संपर्क परिक्रमा सुरूच आहे. त्यामुळे लोकसभेलाही भाजपला मुंदडांचा लाभ घेऊन भविष्यात भाजपकडूनच पराभूत झालेल्या नमिता मुंदडा आगामी विधानसभेला भाजपच्या उमेदवार झाल्या तर नवल वाटायला नको. त्यामुळे नियोजन समिती हे निमित्त असून आगामी निवडणुकांचेच यातून नियोजन केले जातेय, अशीच राजकीय गोटात चर्चा आहे.

Web Title: beed news politics pankaja munde