coronavirus - कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक 

दत्ता देशमुख
Monday, 30 March 2020

 • प्रतिबंधात्मक उपायांत अव्वल 
 • आगामी काळासाठी बी प्लॅनही तयार 
 • जिल्ह्यात एकही नाही कोरोना रुग्ण वा संशयित 

बीड - कुठल्या ना कुठल्या बाबीने नेहमी चर्चेत आणि नाव खराब असलेल्या बीड जिल्ह्याचा कोरोनाशी लढण्याचा पॅटर्न मात्र राज्यासाठी दिशादर्शक ठरावा असा आहे. सर्वाधिक स्थलांतरित जिल्ह्यात अद्याप तरी एकही कोरोना विषाणूची लागण झालेला आणि संशयित रुग्ण सापडला नाही. भविष्यात काही अघटित घडलेच तर त्याच्यासाठीचा ‘बी प्लॅन’ही तयार आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत ११ जणांच्या स्वॅबची तपासणी केली असून सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पुणे-मुंबईसह इतर जिल्ह्यांत कामधंदे आणि नोकरीला गेलेले आणि ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेले दाखल होत आहेत. त्यातून काही उद्भवले तर त्याच्यासाठीच्या उपाययोजना प्रशासनाने आतापासूनच तयार केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावाचे गर्दी हे मुख्य कारण असून, यावरच प्रशासनाने तोडगा काढत त्याची कडक अंमलबजावणी केल्याने आतापर्यंत तरी परिस्थिती आटोक्यात आहे.

हेही वाचा - परळीतील लाखावर वीटभट्टी कामगार आर्थिक संकटात

विशेष म्हणजे दुबईहून विमानाने पुण्यात आलेल्या काहींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यांच्याबरोबर प्रवास केलेले बीडचे तिघे होते. तपासणीनंतर या तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले. स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी हेच याचे मुख्य कारण आहे. यातल्या अनेक उपाययोजना राज्यात इतरत्र आढळत नाहीत, हेही विशेष. 

प्रतिबंधात्मक उपायांची कडक अंमलबजावणी 
टीम लीडर म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहुल रेखावार यांनी सुरवातीलाच जमावबंदी, तंबाखूजन्य दुकानबंदी, नंतर सर्वच आस्थापना बंद, धार्मिक स्थळे बंद, अत्यावश्यक सेवांसाठी शिथिलतेच्या काळातील निर्बंध, जिल्ह्याच्या सरहद्दींवर तपासणी असे आदेश काढले. त्यांच्या आदेशांची पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडून कडक अंमलबजावणी होत आहे. या कामात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ‘झेडपी’ची यंत्रणाही कामाला लावली.

हेही वाचा - ग्रामीण भागातील रस्त्यावर जागोजागी कुपाट्या

महसूल, गृह, ग्रामविकास व आरेाग्य यांचा उत्तम समन्वय आणि झोकून दिलेले काम यामुळे आतापर्यंत तरी परिस्थिती आटोक्यात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांची यंत्रणाही सतर्क आहे. 

कडक अंमलबजावणी व भविष्याचाही ‘बी प्लॅन’ 

 •  आदेशाच्या उल्लंघनाचे २१० गुन्हे 
 • सोशल मीडियावरून अफवांचे १५ गुन्हे 
 • अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी सात ते साडेनऊपर्यंत शिथिलता 
 • अत्यावश्यक सेवांसाठीच पंपांवरून इंधन 
 • इतरांना इंधन देणाऱ्या पंपावर सीलची कारवाई 
 • बाहेरून येणाऱ्या ४८ हजार जणांची चेकपोस्टवरच तपासणी 
 • बाहेरजिल्ह्यांतून आलेल्या ३९० जणांचे होम क्वारंटाइन 
 • होम क्वारंटाइन असलेल्यांची ‘LIFE FREE ३६०’ या ॲपवर नोंद 
 • होम क्वारंटाइन असलेल्यांवर ॲपद्वारे नियंत्रण 
 • खासगी-सरकारी रुग्णालयांत तपासणीत लक्षणे आढळली तर ‘COVID 19 BEED’ ॲपवर नोंद 
 • बाहेरून आलेल्यांची आशा, अंगणवाडी सेविका, डॉक्टरांकडून नोंद आणि प्राथमिक तपासणी 
 • ऊसतोडणीहून परतलेल्यांची गावाबाहेर शाळांतच निवास-भोजनाची सोय 
 • लॉकडाऊनचा कालावधी वाढला तर पोलिसांचा ‘बी प्लॅन’ तयार 
 • जर एखादा रुग्ण आढळला तर आरोग्य विभागाची ४६० पथके 
 • रुग्ण आढळलेल्या गावांच्या तीन किलोमीटर अंतराच्या सीमा सील करून या पथकांद्वारे संपर्कातील लोकांचा शोध घेणार 
 • सर्व तालुक्यांच्या ठिकाणी विलगीकरण कक्षात ७०० खाटांची सोय 
 • बीड व अंबाजोगाईला प्रत्येकी शंभर खाटांचे अलगीकरण कक्ष 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Beed Pattern for Corona Fighting Guide to the State