esakal | परळीतील एक लाखावर वीटभट्टी कामगार आर्थिक संकटात 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

परळी शहर व परिसरात एक ते दीड हजार वीटभट्या आहेत. एका वीटभट्टीवर किमान ५० ते ६० कामगार व त्यांच्या परिवाराचे सदस्य काम करीत असतात. सुरवातीला या वीटभट्टीमालकांनी जोपर्यंत कामे सुरू होती तोपर्यंत रोजगार दिला

परळीतील एक लाखावर वीटभट्टी कामगार आर्थिक संकटात 

sakal_logo
By
प्रा. प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि. बीड) - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत बंद असल्याने वीटभट्टी कामगारांचे प्रचंड हाल होत असून, जिल्ह्याच्या सीमा बंद केल्याने गावाकडे जाता येत नाही आणि वीटभट्टी मालकही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा देत नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

शहर व परिसरात एक ते दीड हजार वीटभट्या आहेत. एका वीटभट्टीवर किमान ५० ते ६० कामगार व त्यांच्या परिवाराचे सदस्य काम करीत असतात. सुरवातीला या वीटभट्टीमालकांनी जोपर्यंत कामे सुरू होती तोपर्यंत रोजगार दिला. या पैशातून कामगारांनी कुटुंबाची उपजीविका भागवली; पण काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात जनता संचारबंदी लागू झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाल्याने वीटभट्टी कामगारांचे काम बंद झाले आहे.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

जवळ असलेल्या पैशांवर काही दिवस काढले. पुढे काही दिवस वीटभट्टी मालकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करून दिल्या; पण या वीटभट्टी मालकांचेही सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्यांच्याकडेही आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. घर चालविणे अवघड झाल्याने या कामगारांना पैसा कुठून द्यायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे काम बंद झाले आहे. गावाकडे पाठवायचे तर जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. वीटभट्टीमालकांनी पैसा देणे बंद केल्याने आता करायचे काय? असा प्रश्न कामगारांना पडला आहे.

हेही वाचा - कोरोना विषाणू  येऊच नये म्हणून....

आम्हाला जेवणाची व्यवस्था करा, अन्यथा गावाकडे जाऊ द्या, आमच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने तरी आमची जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील कामगारांनी केली आहे. तालुक्यात जवळपास या सर्व मजुरांची संख्या एक लाखावर आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही वीटभट्टी मालकांकडून उचल म्हणून पैसे घेतलेले असतात. याच काळात आमचे काम जास्त होत असल्याने मालकाचे पैसे फिटतात; पण हा व्यवसाय बंद झाल्याने आमचे दुहेरी नुकसान झाले आहे. पैसे फेडणे, कमवणे तर दूरच; पण आमचे खायचे वांदे झाले आहेत. आम्ही करावे तरी काय? असा प्रश्न कामगारांकडून उपस्थित होत आहे.

loading image