Beed Police - नैराश्यात आहात, तर मग आमच्याशी बोला 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

  • तणावात असलेल्यांना बीड पोलिस देणार मानसिक आधार 
  • ‘प्रोजेक्ट सहायता’ मदत कक्षाची स्थापना 
  • २४ तास साधता येणार संपर्क 

बीड -  समाजात घडणाऱ्या अनुचित घटनांमध्ये बहुतेक घटना या मानसिक आजारातून, नैराश्यातून होतात. आत्महत्यांच्या घटनांचे प्रमुख कारणही असेच असते. अशा लोकांना आधार देण्याचे काम आता पोलिस दल करणार आहे. यासाठी बीड पोलिस दलाने ‘प्रोजेक्ट सहायता’ मदत कक्ष हाती घेतला आहे. या माध्यमातून मानसिक खच्चीकरण, नैराश्य आलेल्यांना २४ तास पोलिस आधार देण्यासाठी उपलब्ध असतील. विशेष म्हणजे पोलिसांनाही मानसिक खच्चीकरण झालेल्यांना ओळखता यावे, यासाठी पोलिसांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. 

तुम्ही आमच्याशी बोला, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून तुम्हाला या कठीण प्रसंगातून निश्‍चितच बाहेर काढू, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नैराश्यग्रस्तांना दिला आहे. भावनांची घुसमट झाली, काही चुकीचे प्रसंग स्वत:बाबत घडले, काही कारणांनी घुसमट झाली की व्यक्ती नैराश्यात जातो. त्याला त्याच्या भावना, अडचण, कारण व्यक्त करता आले नाही तर अधिकच घुसमट होऊन मग तो काहीतरी टोकाचे पाऊल उचलतो.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात सव्वाशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या

घटना घडल्यानंतर त्यावर पोलिस कारवाई करण्यापेक्षा अशा घटनाच रोखण्यासाठी बीड पोलिसांनी पाऊल उचलले आहे. अशा लोकांना मानसिक आधार देण्यासाठी हा ‘प्रोजेक्ट सहायता’ प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी प्रभारी पोलिस अधिकारी सुषमा पवार यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याशी अशा नैराश्यग्रस्तांना कधीही संपर्क (८८३०२१७९५५) साधता येणार आहे. श्रीमती पवार अशा व्यक्तींना डॉ. मोहम्मद मुजाहिद व डॉ. अशोक मते (मानसोपचारतज्ज्ञ) या दोघांकडून उपचारही मिळवून देतील. 

हेही वाचा - गेवराईत बोगस खतविक्री सुरूच, तब्बल साडेबारा लाखांचा साठा जप्त

ठाण्यात आलेल्यांनाही शोधणार 
काही मनोरुग्ण आणि मानसिक आजार व्यक्ती पोलिस ठाण्यांतही येत असतात. अशा प्रकारच्या लोकांना ओळखण्यासाठी व त्यांची लक्षणे कशा प्रकारची असतात यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. जेणेकरून अशा लोकांना ओळखून त्यांना आरोग्य विभागाकडून उपचार दिले जातील. 

अनेक अनुचित घटना या मानसिक आजारातून, नैराश्यातून घडतात. अशा व्यक्तींना आधार देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. केवळ कायदा-सुव्यवस्थेबरोबरच माणुसकीचा आधार देणेदेखील आमचे कर्तव्य आहे. 
- हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक, बीड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Police - If you are depressed, then talk to us