esakal | खरिपाचे अतिवृष्टीने तर, रब्बीचे अवकाळीने नुकसान; शेतकऱ्यांची आस्मानी संकटाशी झुंज सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Rain News

पहिल्या पेरणीचा आर्थिक भुर्दंड सहन करीत शेतकऱ्यांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली. वेळोवेळी पडलेल्या पावसामुळे मुग, सोयाबीन, उडीद, कापूस, तूर आदी खरिपाचे पिकं जोमात आले होते.

खरिपाचे अतिवृष्टीने तर, रब्बीचे अवकाळीने नुकसान; शेतकऱ्यांची आस्मानी संकटाशी झुंज सुरूच

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या बळीराजाला कधी अस्मानी तर, कधी सुलतानी संकटाशी सामना नित्याचाच झाला आहे. यावर्षी खरीप पेरणीच्या सुरुवातीला सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करीत दुबार पेरणी करावी लागली. आलेले पीकही अतिवृष्टीमुळे वाहून गेले. त्यानंतर रब्बीचे सुगीही बहरलेली असताना शुक्रवारी (ता. १८) पहाटे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारी, हरभरा, गहू आदी रब्बी पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

वाचा - जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला पाडणार एकटे, राज्यमंत्री सत्तार यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसही विरोधात


मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट यासारख्या संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्याला सरकारच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने कायम अठराविश्वे दारिद्र्य भोगावे लागतेय. यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच पावसाचे दमदार आगमन झाल्याने सुखावलेल्या शेतकऱ्यांनी मोंढ्यातून खरीप पिकाचे बियाणे खरेदी केले. मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केल्यानंतर कंपनीच्या दोषामुळे बोगस निघालेले बियाणे उगवलेच नाही. कृषी खात्याकडे तक्रारी देऊनही पंचनाम्याच्या पुढे काहीच झाले नाही.

पहिल्या पेरणीचा आर्थिक भुर्दंड सहन करीत शेतकऱ्यांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली. वेळोवेळी पडलेल्या पावसामुळे मुग, सोयाबीन, उडीद, कापूस, तूर आदी खरिपाचे पिकं जोमात आले होते. दिवाळीच्या आसपास झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतला. यामुळे कापूस, मुग, तूर आदींचे उत्पन्नात घट झाल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. दमदार पावसामुळे दोन वर्षानंतर यंदा रब्बीची पेरणी वेळेवर तसेच शंभर टक्के झाली होती. जलस्रोत वाढल्याने हरभरा, गहू, ज्वारी आदी पिके जोमात आलेली असताना दोन दिवसात जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने सुरवात केली.

वाचा - एका उंदरामुळे औरंगाबादला ३२ तासानंतर सुरु झाला पाणीपुरवठा! नागरिकांची पाण्यासाठी ओरड

शुक्रवारी (ता.१९) पहाटे जिल्ह्यातील विविध तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा यासारखी पिके मातीत मिसळली आहेत. उभ्या ज्वाऱ्या, गहू जमिनीला झोपल्यामुळे मातीत गेले. खरिपाप्रमाणे रब्बीची सुगीही निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक कोंडीत सापडला आहे. अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देणार का यावरच आता शेतकऱ्यांची भिस्त आहे.

पंचनामे करण्याची मागणी
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने नुकसानभरपाई देण्यासाठी केलेल्या चुकीच्या पंचनाम्यामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या रब्बी पिकाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

Edited - Ganesh Pitekar