शिवसेना संपर्क प्रमुखांना जिल्ह्याचे वावडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

बीड - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू असतानाही शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांची बीडकडे पाठच आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेने त्यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी नाकारल्याने बंडखोरीच्या तयारीत असलेल्या मोरेंचे बीडकडे दुर्लक्ष आहे. 

बीड - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू असतानाही शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांची बीडकडे पाठच आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेने त्यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी नाकारल्याने बंडखोरीच्या तयारीत असलेल्या मोरेंचे बीडकडे दुर्लक्ष आहे. 

शिवसेनेच्या संघटन बांधणीत संपर्कप्रमुख पद हे महत्त्वाचे मानले जाते; मात्र ऐन स्थानिक निवडणुकीच्या धामधुमीत जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे फिरकायला तयार नाहीत. विशेष म्हणजे, या वेळी गेवराईत बदामराव पंडित शिवसेनेत आले असून बीडमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीचा लाभ घेण्याची शिवसेनेला संधी आहे. असे असतानाही त्यांना जणू जिल्ह्यातील शिवसेनेचे वावडे आहे की काय, असा प्रश्‍न पडत आहे. 

जिल्हाप्रमुख अनिल जगताप त्यांच्या सहकारी उपजिल्हाप्रमुखांसह सेनेच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरच संपर्कप्रमुख संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत. तसे, पूर्वीही त्यांनी शिवसेना वाढीऐवजी स्वत:चे "इंटरेस्ट' जपणाऱ्यांनाच महत्त्व देण्याचा प्रयत्न केल्याचे लपून राहिलेले नाही. नव्याने शिवसेनेत आलेल्या एका "रोहयो घोटाळ्या'तील संबंधिताला जिल्हा प्रमुखपद मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली; पण त्यातही अपयशी ठरलेल्या मोरेंना निकटवर्तीयांसाठी मुंबईत महापालिकेची उमेदवारीही मिळवता आलेली नाही. त्यामुळे त्यांनीच बंडखोरीची तयारी केल्याचे समजते. संपर्कप्रमुखच बंडखोरी करणार असतील तर पक्षाच्या निवडणूक पत्रकांवर त्यांचे फोटो तरी कसे छापायचे, असाही प्रश्‍न बीडच्या शिवसैनिकांना पडला आहे.

Web Title: beed shiv sena