Beed Siddheshwar school Two teachers donations crime
Beed Siddheshwar school Two teachers donations crimesakal

बीड : डोनेशनसाठी पैसे घेताना दोन शिक्षक पकडले

आमदार सोळंकेंचे शिक्षणाधिकाऱ्यांसह स्टिंग ऑपरेशन

माजलगाव : सिद्धेश्वर विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरिता फी च्या नावाखाली (डोनेशन) लूट करत असल्याचा प्रकार मंगळवारी स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आला. येथील वैष्णवी मंगल कार्यालयामध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी व पोलिसांसह हे स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी पालकांकडून फीच्या नावाखाली घेतलेली एक लाख ७६ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तर दोन शिक्षकांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शिक्षण संस्काराच्या शिदोरीवर या सिद्धेश्वर विद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. सिद्धेश्वर विद्यालयामध्ये प्रवेश मिळविण्याकरिता पालकांची धडपड असते. या विद्यालयात प्रवेशाकरिता पालकांची आर्थिक लूट होत असल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे गोपाळ पैंजणे यांनी वेळोवेळी उपोषणे देखील केले. शाळा सुरू होण्याच्या कालावधीत प्रवेशासाठी पालकांची गर्दी होते तर फीच्या नावाखाली लूट होत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय व बीड शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याकडे केलेल्या आहेत.

मंगळवारी येथील वैष्णवी मंगल कार्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून प्रवेशासाठी पालकांकडून एका प्रवेशासाठी पंधरा ते वीस हजार रुपये अशी फी घेऊन प्रवेश निश्चित केला जात होता. याप्रकाराची तक्रार शिक्षणाधिकारी कुलकर्णी व आमदार सोळंके यांच्याकडे करण्यात आली. यानंतर आमदार प्रकाश सोळंके व शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी पोलिसांना सोबत घेत वैष्णवी मंगल कार्यालयात जाऊन जात स्टिंग ऑपरेशन केले. पालकांकडून कर्मचाऱ्यांमार्फत रोख रक्कम घेणे सुरू होते. यावेळी पोलिसांनी एक लाख ७६ हजार रुपये रोख रक्कम येथून जप्त केली आहे. दरम्यान याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात परमेश्वर आदमाने व सदाशिव ढगे या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

स्टिंग ऑपरेशनदरम्यान सिद्धेश्वर विद्यालयाच्या प्रवेशाचे अर्ज आणि पैसे सापडले आहेत. संबंधित पालकांनी घाबरू नये. त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित केले जातील.

- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, बीड

सिद्धेश्वर विद्यालयाकडून सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली जाते याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांसह वैष्णवी मंगल कार्यालयामध्ये स्टिंग ऑपरेशन केले. प्रवेशाकरिता पैसे घेणारे दोन शिक्षक व पैसे सापडले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. मात्र यामागील सूत्रधाराची सखोल चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. तर संस्थेमधील मागील चार वर्षांच्या कार्यकाळातील प्रवेशासाठी, गोरगरीब पालकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट झाली आहे. यासाठी समिती नेमून याची कसून चौकशी करण्यात येईल.

- प्रकाश सोळंके, आमदार, माजलगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com