Beed : सामाजिक कार्यकर्त्याने उघड केला पीआर कार्ड घोटाळा

शहरातच दोन हजार बोगस पीआर कार्डचा आरोप
beed scam
beed scamesakal

बीड : जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या हजारो एकर जमिनींचे बेकायदा हस्तांतरणाचे प्रकार समोर आल्यानंतर आता शहरात देखील दोन हजारांवर बोगस पीआर कार्ड असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचे कागदपत्रेच सादर केली.

जिल्ह्यात रोज नवीन काही तरी घोटाळा समोर येतो. मागच्या काळात जिल्हाभरातील विविध हिंदू देवस्थाने आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींचे बेकायदा हस्तांतरण केल्याचे प्रकार समोर आले. यात तत्कालीन अधिकाऱ्यांसह विद्यमान अधिकाऱ्यांची साखळीही समोर आली. या प्रकरणांच्या चौकशीनंतर अनेक ठिकाणी जमिनींचे हस्तांतरण रद्द करण्यात आले. या प्रकरणी गुन्हे, तक्रारी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही झडत आहेत. मात्र, आता यानंतर शहरातील मालमत्तांचे बोगस पीआर कार्ड तयार केल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्याने समोर आणला आहे.

मालमत्तांचे जे व्यवहार झाले, त्या व्यवहारांची मूळ संचिका भूमि अभिलेख कार्यालयाकडे नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. या घोटाळ्यात भूमाफियांसह अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप श्री. खोड यांनी केला आहे. संचिका नसताना पीआर कार्ड बनविले कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोंढा भागात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावाने वादग्रस्त असलेलं दोन हेक्टर ८० गुंठे क्षेत्र असल्याचं दाखवण्यात आले आहे. मात्र या सर्व जागेची परस्पर विक्री केली जात असल्याचेही समोर आले आहे. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असू शकतो, असा आरोपही त्यांनी केला.

या तक्रारी केल्यानंतर पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याचेही रामनाथ खोड यांनी म्हटले आहे. पोलिसांकडून आतापर्यंत पाच ते सहा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी रामनाथ खोड यांनी येथील शनी मंदिर देवस्थानच्या जमिनींवर बेकायदा कब्जा केल्या प्रकरणी कायदेशीर लढाई लढली. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते आयुक्त आणि कोर्टाच्या पायऱ्याही चढल्या. त्यांनी मंदिराची आतापर्यंत शेकडो एकर जमीन परत मिळविली आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमणेही काढण्यात त्यांना यश आले आहे. आता त्यांनी बोगस पीआर कार्डचे प्रकरण समोर आणल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप श्री. खोड यांनी केला.

पीआर कार्ड दिले तर त्याची संचिका कुठे आहे हे भूमी अभिलेख कार्यालयाने दाखवावे. आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. आपण पाठपुरावा करत राहणार. मात्र, माफिया व अधिकाऱ्यांच्या साखळीकडून आपल्यावर पोलिसांकडून दबाव आणला जात आहे.

- रामनाथ खोड, सामाजिक कार्यकर्ते, बीड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com