पंढरपूरसाठी १५० बस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

या आगारांतून असणार विशेष बस
पंढरपूरला जाण्यासाठी बीड विभागातील आगारांमधून एकूण १५० बसची सोय करण्यात आलेली आहे. यामध्ये परळी आगारातून २१ बस, धारूर १७, माजलगाव १८, गेवराई १७, पाटोदा १४, आष्टी १४, अंबाजोगाई २० बसेस अशा जादा बस वारकऱ्यांच्या सोयीसाठी सोडण्यात येणार आहेत.

बीड - आषाढी यात्रेनिमित्त जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. या वारकऱ्यांची येण्या-जाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक वर्षी एसटी महामंडळाच्या वतीने विशेष बसची सोय करण्यात येते. यंदाही वाकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातून पंढरपूर यात्रेसाठी १५० बसची सोय करण्यात आली आहे. यामध्ये बीड विभागात लालपरी (एम.एस. बॉडीच्या) ३६ बससुद्धा यात्रेसाठी सज्ज झाल्या आहेत.

ठिकठिकाणांहून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या दिसून येत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जातात. 
यामुळे एसटी महामंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा बसचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील आठ आगारांतून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष बसची सोय करण्यात आली आहे. यासह सध्या जिल्हा बस विभागात लालपरीच्या (एम.एस. बॉडीच्या) ३६ बस दाखल झालेल्या आहेत. या बससुद्धा वारकऱ्यांच्या सोयीसाठी सोडण्यात येणार आहेत. आठ जुलै ते १९ जुलैदरम्यान या सर्व विशेष बस वारकऱ्यांच्या सेवेत राहणार आहेत. 

प्रवाशांनी खासगी वाहनांतून प्रवास न करता, बसने प्रवास करण्याचे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी ए. एस. बनसोडे यांनी केले आहे.

तिकिटाचे असे असणार दर
बीड ते पंढरपूर २५५ रुपये, गेवराई ते पंढरपूर ३००, माजलगाव ते पंढरपूर २८५, धारूर ते पंढरपूर २३५, परळी ते पंढरपूर २७५, अंबाजोगाई ते पंढरपूर २४५, पाटोदा ते पंढरपूर २१५, आष्टी ते पंढरपूर २०० रुपये असे दर प्रवासासाठी असणार आहेत. 

जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बसची सोय करण्यात आली आहे. यासह नवीन आलेल्या ३६ बससुद्धा पंढरपूरला सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी यात्रेसाठी सोडलेल्या बसचा लाभ घ्यावा. 
- अशोक पन्हाळकर, विभागीय नियंत्रक, बीड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed St Depo Pandharpur Aashadhi Wari