बीडकरांना गर्दीचा मोह आवरेना; लग्नसोहळ्यांवर येऊ शकते मर्यादा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

  • पुन्हा दहा लोक किंवा नोंदणी विवाहाच्या आदेशाची शक्यता 
  • लग्नातील गर्दीतूनच कोरोना संसर्गाची प्रशासनाला अधिक भीती 
  • अनेकदा वऱ्हाडी बाहेरजिल्ह्यांतील असल्याने भीती 
  • संपर्कातील लोकांनीही माहिती दडवू नये 

बीड -  जिल्ह्यातील लोकांमध्ये कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले असले, तरी बुधवारी (ता. तीन) आढळलेल्या बीड शहरातील तीन रुग्णांमुळे कोरोनाचा बीड जिल्ह्याला असलेला धोका संपलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक शिथिलता मिळाल्या असल्या, तरी लग्नासाठीची ५० लोकांची आणि सभागृह व मंगलकार्यालयांची परवानगी रद्द होऊन पुन्हा दहा लोक किंवा नोंदणी पद्धतीनेच लग्नाचा आदेश कधीही धडकू शकतो. नव्या शिथिलतेनंतर वधू- वर या दोन्ही पक्षांकडील मंडळींना गर्दीचा मोह आवरत नसल्याचे चित्र आहे. 

सर्वाधिक काळ संपर्क हा लग्नसोहळ्यात येतो. विशेषत: लग्नसोहळ्यात हजर राहणारे वऱ्हाडी (वधू किंवा वराकडील) बाहेरजिल्ह्यांतील असतात. लग्नातील सर्व विधी व सोपस्कर यासाठी साधारण सात-आठ तास लोक एकत्र थांबत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या नियमाप्रमाणे पुन्हा एकदा दहा लोकांत घरच्या घरी लग्न वा नोंदणी पद्धतीनेच लग्न असा आदेश काढला जाण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली. 

हेही वाचा - गेवराईत बोगस खतविक्री सुरूच, तब्बल साडेबारा लाखांचा साठा जप्त

लग्नातील गर्दीच ठरू शकते धोका 
लॉकडाउनच्या काळात मुळात विवाहसमारंभानाच बंदी होती. नंतर नोंदणी पद्धतीने व त्यानंतर दहा लोकांना लग्नसमारंभासाठी परवानगी देण्यात आली. शेवटच्या टप्प्यात ५० लोकांसह सभागृह, मंगलकार्यालयांतील लग्नासमारंभाला परवानगीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले; मात्र यामुळे वधू-वर अशा दोन्हींकडील मंडळींना मर्यादा राहिल्या नसल्याचे दिसत आहे. मुळात ५० लोकांची परवानगी असली तरी तेवढ्या लोकांची गर्दी गरजेचीच आहेच का, असा मुद्दा असताना लग्नातील उपस्थितांचा आकडा देानशेपर्यंत जात असल्याचे दिसत आहे. त्यात लग्नातील विविध विधी उरकायला सात ते आठ तास लागतात. त्यात हळदी समारंभ आदल्या दिवशी असेल तर तो अधिकचाच वेळ. या दोन्ही पक्षांपैकी एखादा पक्ष (वर-वधू) बाहेरजिल्ह्यांतील असतात. त्यांच्यात येवढा काळ संपर्क हाच मोठा धोका होईल अशी प्रशासनाला भीती आहे. यापूर्वी बीड शहरातल्या एका लग्नसमारंभाने प्रशासन आणि जिल्ह्याला तसा धडा दिलेलाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घरातल्या घरात दहा जणांच्या उपस्थितीत किंवा विवाह नोंदणी पद्धतीनेच विवाहसमारंभाला परवानगी द्यावी, असे आदेश जिल्हा आपत्ती प्राधिकरण काढू शकते.

हेही वाचा - रोहयोत ठाण मांडलेल्या सव्वाशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या

लॉकडाउनच्या नव्या मागदर्शक सूचनांमध्ये पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सरकारने तसे अधिकार दिले आहेत; मात्र बाहेरजिल्ह्यांतून आलेल्यांचा सर्वाधिक काळ संपर्क हा सोहळ्यांमध्येच आणि विशेषत: लग्नांमध्ये होतो. बुधवारी (ता. एक) सापडलेले नवीन तीन रुग्णही बीडमधील त्या लग्नसमारंभाला आले होते. त्यामुळे ५० लोकांच्या लग्नाला आणि सभागृहे व मंगलकार्यालयांना परवानगी दिली असली, तरी लोकांना बडेजावपणाचा मोह आवरत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दहा लग्नाला दहा लोकांची परवानगी आणि तेही घरीच असे नवे आदेश कधीही धडकू शकतात. 

संपर्कातील लोकांनीही माहिती दडवू नये 
आतापर्यंत आढळलेले बहुतेक रुग्ण हे बाहेरजिल्ह्यांतून आलेले आहेत; मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आणि कोरोनाग्रस्तांनी त्यांचा संपर्क झालेल्यांची माहिती दडविल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे संपर्कातील लोकांचा शोध घेताना आरोग्य विभागाला मोठी कसरत करावी लागते. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनीही स्वत:हून पुढे यायला हवे आणि ज्यांना लागण झाली त्यांनीही त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती स्वत:हून द्यायला हवी. ज्यामुळे जिल्ह्याचा धोका आटोक्यात राहण्यास मदत होणार आहे. 
 

गर्दी व विविध विधींमुळे जास्त लोकांचा आणि जास्त संपर्क येतो. त्यामुळे जिल्ह्याला आणि कुटुंबालाही धोका आहे; तसेच कोरोनाग्रस्तांनी त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती द्यावी, संपर्कात आलेल्यांनीही स्वतःहून पुढे यावे. 
- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, बीड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beedkars were not tempted by the crowd; Limitations may occur at weddings