‘मजविप’च्या वतीने अडीच लाखाची मदत

शिवचरण वावळे
Thursday, 23 April 2020

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाख ६२ हजार ५५ रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी दिली.

नांदेड: देशभरात ‘कोरोना’ मुळे आपदग्रस्तांना मदत म्हणून मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाख ६२ हजार ५५ रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी दिली.

यात नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने दीड लाखाचा निधी देण्यात आला असून, यामध्ये नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे १० हजारांचे योगदान आहे. तर मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर जिल्हांतर्गत उदगीर शाखेने ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश दिला. यात शाखेचे पदाधिकारी डॉ. लखोटिया, डॉ.पाटील, बेंद्रे, चिल्लरगे यांनी हा निधी उभा केला. परभणी शाखेच्यावतीने २८ हजार ५०० पांडे, विश्वनाथ थोरे, ॲड. माधुरी क्षीरसागर, श्री.मुथा यांनी पुढाकार घेऊन ही रक्कम जमा केली. 

मुख्यमंत्री सहायता निधीस रक्कम जमा करण्याचे काम सुरू

 लातूर शाखेच्यावतीने अशोक गोविंदपूरकर, हरीश देशपांडे, डॉ. चेतन सारडा यांनी १५ हजार रुपयांचा निधी तसेच अहमदपुर शाखेच्या वतीने धोंडीराज लोहारे पाच हजार, अंबेजोगाईचे थोरात यांनी पाच हजार, बीडच्या वतीने डि. के. देशमुख यांनी पाच हजार रुपये हिंगोली माजी आमदार पंडितराव देशमुख, शंकर खराटे, ॲड. रामचंद्र बागल, विठ्ठल सोळंके, नंदू वैद्य यांनी मिळून २८ हजार रुपयांचा निधी असे मिळुन दोन लाख ६२ हजार ५५ रुपये इतका निधी त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला. औरंगाबाद, जालना, बीड शाखेच्या वतीने अजूनही मुख्यमंत्री सहायता निधीस रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्याचे प्रा. शरद उदावंत यांनी सांगितले.

हेही वाचा- खळबळ : नांदेडात शिक्षकाची आत्महत्या

सर्वपक्षीय आंदोलनाच्या वतीने पाच हजार गरजवंतांना मदत

नांदेड: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन बंद करण्यात आल्यानंतर सर्वपक्षीय आंदोलनच्या वतीने ‘लॉकडाउन’च्या काळात गरजवंतांना अन्न-धान्याचे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत सर्वपक्षीय आंदोलनच्यावतीने पाच हजार किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये महिनाभर पुरेल इतके धान्य असल्याने दोन वेळच्या जेवणाची सोय कशी होणार, या चिंतेत असलेल्या गरजवंत कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर मागील महिनाभरापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू असल्यामुळे गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गरजवंतांना मदत म्हणून सर्वपक्षीय आंदोलनच्या वतीने लोकांना अन्न धान्याची किट वाटप करण्यात येत आहे. (ता.१९) एप्रिलपासून आजपर्यंत जवळपास पाच हजार लोकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. यात गव्हाचे पिठ, तांदुळ, हरभरा दाळ, मसूर दाळ, साखर-चहापत्ती, खाद्य तेल, साबण, लोणचे, मिठ आदी महिनाभर पुरेल असे साहित्य आहे.

हेही वाचा-  रुग्णालय बंद ठेवल्यास ताकीद अन् सुरू ठेवण्यास पासची अडवणूक, खासगी डॉक्टर दुहेरी संकटात

पुन्हा पाच हजार लोकांना किट वाटप करणार

प्रभाग समित्यांच्या मार्फत खऱ्या गरजूंंना धान्य वाटप करण्यात येत आहे. एप्रिलपासून किट वाटपाचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. आतापर्यंत पाच हजार लोकांना किट वाटप करण्यात आली आहे. तर २५ एप्रिलपासून दुसऱ्या टप्यात पुन्हा पाच हजार लोकांना धान्याची किट वाटप करण्यात येणार आहे. -मौलाना मुफ्ती अयुब कासमी, मराठवाडा अध्यक्ष, सर्वपक्षीय आंदोलन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On behalf of Marathwada Janata Vikas Parishad So much for the CM Assistance Fund