निदान करुन उपचार करु...कोण म्हणाले ते वाचा

कृष्णा जोमेगावकर
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी रुजू होताच कामाचा धडाका सुरु केला. पहिल्या दिवशी माहूर, किनवट दौरा केल्यानंतर मंगळवारी (ता. १८) सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमवेत विविध ठिकाणी भेट देऊन बैठकीला हजेरी लावली. यानंतर त्यांच्या कक्षात अभ्यागतांच्या भेटी घेतल्या.

नांदेड : आपण डॉक्टर असल्यामुळे जिल्ह्यातील समस्या, तक्रारी तसेच विकासकामाबाबत पहिले निदान करुन त्यावर पंधरा दिवसांनतर उपाय, उपचार करु, असे धडाकेबाज कामाचे संकेत नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

जबाबदारी स्विकारताच काम सुरु
जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर डॉ. विपीन यांनी मंगळवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी अनौपचारीक संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्ह्यात आरोग्य तसेच शिक्षण विषयक कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगीतले. 

आदिवासींच्या विकासावर भर देणार
यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व गडचिरोली येथे आदिवासी भागात काम केले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातही माहूर, किनवट या तालुक्यातील आदिवासींच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्याचा पहिला दौरा याच भागात केल्याचे त्यांनी सांगीतले.

हेही वाचा.... जिल्हाधिकारी देणार माहूरकडे लक्ष

वाळूच्या अवैध उपसाकडे लक्ष देणार
वाळू समस्येबाबत बोलताना डॉ. विपीन यांनी वाळूच्या उपसाबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगितले. वाळू घाटाची ठराविक दिवसाला ड्रोन कॅमेराने निगराणी केली जाईल. गौण खनीजाचा उपसा ठरवून दिलेल्या जागेत होईल. वाळू वाहतुकीच्या वाहनाला जीपीएस बसविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचलेच पाहिजे....नांदेड जिल्ह्यात दोन कर्मचाऱ्यांना मारहाण

दौऱ्यात घेणार नागरीकांचे फोन
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी रुजू होताच कामाचा धडाका सुरु केला. पहिल्या दिवशी माहूर, किनवट दौरा केल्यानंतर मंगळवारी (ता. १८) सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमवेत विविध ठिकाणी भेट देऊन बैठकीला हजेरी लावली. यानंतर त्यांच्या कक्षात अभ्यागतांच्या भेटी घेतल्या. यावेळी निवेदनाबाबत नागरीकांची ते चौकशी करत होते. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पाठपुरावा करावा. महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी रेड, ग्रीन व ऑरेंज अशा कव्हरमध्ये ठेवून त्या आपल्याकडे पाठवाव्यात, अशा सुचना त्यांनी दिल्या. आपण जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी त्यांना मोबाईलवर संपर्क करता येईल, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांची ओखळ
नागपूर येथील रहिवासी असलेले डॉ. विपीन ईटणकर यांचे एमबीबीएस या वैद्यकीय क्षेत्रातील पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील ‘आयएएस’ला देशात चौदाव्या, तर राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यशाला गवसणी घातली. डॉ. विपीन यांनी गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) ता. २९ नोव्हेंबर २०१७ पर्यंत काम केले. यानंतर त्यांची बदली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. या ठिकाणी अडीच वर्षे पदभार स्वीकारल्यानंतर शासनाने त्यांची ता. १५ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Being a doctor, I will diagnose and treat, nanded news