esakal | डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने मराठवाड्याला लॉटरी!
sakal

बोलून बातमी शोधा

bhagwat karad

डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने मराठवाड्याला लॉटरी!

sakal_logo
By
दयानंद माने

औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धक्कातंत्रांचा अंदाज असल्याने दोन दिवसांपासून सुसाट सुटलेल्या अफवांची वावटळ आज अखेर धक्कातंत्राच्या बातमीनेच खाली बसली. मोदी पर्वाच्या दुसऱ्या कार्यकाळातील मोठ्या विस्तारात आज महाराष्ट्राला एका मंत्रिपदाला गमवावे लागले. मात्र त्याबदल्यात चार मंत्रिपदे मिळाली. त्यात मराठवाड्याला डॉ. भागवत कराडांच्या रूपाने राज्यमंत्रिपद मिळत सुखद असा धक्का या विस्ताराने दिला आहे. पक्षात अनेक दिग्गज लोक असताना झालेल्या डॉ. कराडांच्या निवडीचे विश्लेषण आता करण्यात येत आहे.

डॉ. भागवत कराड हे तसे व्यवसायाने डॉक्टर. लायन्स, आयएमएसारख्या सामाजिक व व्यावसायिक संघटनांच्या कामात रमणारे. भाजपला बहुजन चेहरा देणारे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना भाजप युतीत सत्ता राखताना व विरोधकांना नामोहरम करताना डॉ. कराड यांच्यासारखा राजकारणाला फारसा परिचित नसलेला चेहरा पुढे आणला. महापालिकेतील भाजपच्या राजकारणाची धुरा त्यांच्यावर सोपविली. पक्षात असलेल्या अनुभवी व ज्येष्ठ अशा हरिभाऊ बागडे व इतर नेत्यांच्या मायंदळीतही त्यांनी आपल्या समाजाचे असलेल्या कराड यांचे नेतृत्व जाणीवपूर्वक जपले. युतीची सत्ता असलेल्या औरंगाबादेत सत्ताफळे चाखत पदे हाशील करताना व भाजपमधील गटबाजीतही त्यांनी कराडांच्या बाजूने आपले वजन लावले.

हेही वाचा: कराडांच्या निवडीनंतर जल्लोष केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरही भागवत कराडांनी आपल्या निष्ठा पंकजा मुंडे यांच्याशी कायम ठेवल्या आहेत. भाजपची राज्यातील मुख्य सूत्रे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात एव्हाना गेली होतीच. २०१९ च्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असणाऱ्या पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाला होता. पंकजा यांच्या पराभवानंतर त्यांच्या नेतृत्वाचे पंख कापण्यात येत असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र भगवानगड, गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन, जन्मदिन, दसरा मेळावा अशा मेळाव्यांच्या निमित्ताची संधी साधत पंकजा यांनी वंजारी समाजात आपल्या नेतृत्वाचा पाया आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

याच काळात भाजपमधील वंजारी समाजात नवे नेतृत्व उभे करण्याच्या हालचाली सुरू होत्या. लातूर जिल्ह्यातून रमेश कराड यांची विधान परिषदेवर तर गेल्या वर्षी भागवत कराडांची थेट राज्यसभेवर पक्षाने निवड केली. त्याचवेळी शंकेची पाल मनात चुकचुकली होती. वंजारी समाजाचे दैवत अशी आपली प्रतिमा निर्माण केलेल्या मुंडे यांच्या समर्थकांना हा एक प्रकारचा धक्का होता. लोकसभेच्या बीड मतदारसंघातून डॉ. प्रीतम मुंडे या सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. त्यांच्याही नावाचा विचार मोदी यांना आता करता आला असता. तेही सोशल इंजिनिअरिंगमध्ये बसले असते. मात्र ते झाले नाही. असो.

हेही वाचा: 'दुधाला ऊसाप्रमाने एफआरपी लागू करावी' शेतकऱ्यांची मागणी

चुणूक दाखविल्याचे फळ-

आजचा दिवस कराडांचा आहे. गेल्या एक वर्षाच्या आपल्या संसदीय कार्यकाळात त्यांनी शेतकरी, पीकविमा, विभागातील रेल्वेचे प्रश्न आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मते मांडून आपली चुणूक दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे फळ त्यांना मिळाले, असे म्हणावे लागेल. नारायण राणे यांना मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला रोखण्यासाठी व भाजपला चांगले यश मिळविण्याच्या उद्देशाने निवडले गेल्याची चर्चा आहे. तर आगामी औरंगाबाद महापालिका निवडणूक डोळ्यासमोर कराड यांची निवड भाजपने केल्याचे बोलले जात आहे. कारण कराड यांनी याआधी महापालिकेत महापौरपदाच्या रूपाने काम केले आहे.

केंद्रीय सत्तेत नांदेड, लातूरचा वरचष्मा

केंद्रीय सत्तेत मराठवाड्याला मिळालेला वाटा आजवर सर्वांत जास्त नांदेड व लातूर जिल्ह्यांना मिळालेला आहे. त्यानंतर बीड, जालना या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. (कै.) शंकरराव चव्हाण (नांदेड), शिवराज पाटील चाकूरकर (लातूर) यांना सर्वाधिक काळ केंद्रीय मंत्री म्हणून लाभला. शंकररावांनी गृह, संरक्षण व अर्थमंत्रिपदांसारखी महत्त्वाची खाती भूषविली. चाकूरकर यांनीही मंत्रिपदांबरोबर लोकसभेचे सभापतिपद भूषविले. त्यानंतर (कै.) प्रमोद महाजन (बीड), रावसाहेब दानवे (जालना), (कै.) विलासराव देशमुख, (कै.) गोपीनाथ मुंडे (बीड), जयसिंगराव गायकवाड (बीड), बबनराव ढाकणे (बीड) आदींनी मंत्रिपदे भूषविली. औरंगाबाद जिल्ह्याला कराड यांच्या रूपाने पहिल्यांदा केद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळत आहे.

loading image