Bharat Bandh Update : बीड जिल्ह्यात भारत बंदला काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद, माजलगावमध्ये कडकडीत बंद

टीम सकाळ
Tuesday, 8 December 2020

दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मंगळवारी (ता.आठ) पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सकाळच्या सत्रात पाहायला मिळाले.

बीड : केंद्र सरकारने पारित केलेला नवीन कृषी कायदा शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मंगळवारी (ता.आठ) पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सकाळच्या सत्रात पाहायला मिळाले. दिल्ली येथे विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली.

Bharat Bandh Update: औरंगाबादच्या बाजार समितीत आडत व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवत व्यवहार बंद ठेवले

जिल्ह्यात देखील विविध पक्ष व संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. बीड शहरातून सोलापूर, परळी, नगर, औरंगाबाद, जालना आदी जाणाऱ्या सर्व बस स्थानकात थांबून होत्या. इतर खासगी अस्थापना काही प्रमाणात सुरु होत्या. परळीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बंदसाठी दुचाकी फेरी काढून आवाहन केले. माजलगावमध्येही बंदचे अवाहन करण्यासाठी फेरी काढण्यात आली. जिल्ह्यातील राष्ट्रवादी प्रणित बाजार समित्यांमध्ये बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान, बाजारपेठांच्या गावांतही बंदच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे.

माजलगाव शहरात कडकडीत बंद
शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी माजलगाव शहरात बंदचे आवाहन करण्यात आले होते. व्यापारी बांधवानी प्रातिसाद दिल्याने बंद कडकडीत पाळण्यात आला. सकाळीच बंदचे आवाहन करत विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या फेरीत मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक  गंगाभीषण थावरे, बाबुराव पोटभरे, नगराध्यक्ष शेख मंजूर,नारायण गोले, अँड. बी. आर. डक, कचरू खळगे, रमेश सोळंके, कल्याण आबुज, धम्मानंद  साळवे, नासेर पठाण,श्रीहरी मोरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Bandh Update Mix Reactions In Beed District