
केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला मंगळवारी (ता.आठ) लातूर येथे मोठा प्रतिसाद मिळाला
लातूर : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला मंगळवारी (ता.आठ) लातूर येथे मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत. या बंदमध्ये सहभाग नोंदवला. या बंदचा मोठा फटका अडत बाजाराला बसला. बंदमध्ये बाजार समिती, अडते, हमाल मापाडी आदींच्या संघटना सहभागी झाल्याने शुकशकाट राहिला. कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
केंद्र शासनाने कृषी कायदे केले आहेत. हे कायदे शेतकऱयांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे या कायद्यांना देशभर विरोध केला जात आहे. दिल्ली येथे तर गेल्या बारा दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनचा एक भाग म्हणून शेतकरी संघटनांच्या वतीने मंगळवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदमध्ये हमाल मापाडींच्या संघटनापासून ते ट्रेड युनियनही सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने व्यापारी संघटना देखील त्यांच्यासोबत उतरल्या आहेत.
त्यामुळे शहरातील गंजगोलाई परिसरातील असलेल्या सर्वच बाजारपेठ बंद राहिल्या. अनेक दुकानासमोर मालक व त्यांचे कामगार शटर लावून बाहेर थांबल्याचे दिसून आले. शहरातील शिवाजी चौक, नंदीस्टॉप, शाहू चौक, रेणापूर नाका आदी भागातील मार्केट बंद राहिले. याचा सर्वात मोठा फटका मार्केट यार्डला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. ६० ते ७० हजार क्विंटल शेतमालाची आवक आहे. यातून कोट्यावधीचे व्यवहार होतात.
पण बंदमध्ये बाजार समिती, व्यापारी, अडते, हमाल मापाडी संघटनाही सहभागी झाले होते. त्याचा परिणाम मार्केटयार्डात सर्वत्र शुकशुकाट राहिला. कोट्यावधीची उलाढाल मात्र ठप्प राहिली आहे. दरम्यान या बंदमध्ये शेतकरी संघटना, काँग्रेस, आप असे राजकीय पक्ष सहभागी झाले होते. या पक्षांच्या वतीने केंद्र शासनाचा निषेध करून हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली.
संपादन - गणेश पिटेकर