'भाऊराव चव्हाण' साखर कारखाना बंद होणार- तिडके 

कृष्णा जोमेगावकर
Thursday, 26 March 2020

चेअरमन गणपतराव तिडके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना अंतर्गत शेतकऱ्यांचा पाच हजार टन ऊस शिल्लक आहे.

नांदेड : भाऊराव चव्हाण उद्योग समुहाच्या देगाव (ता. अर्धापूर) येथील युनिट क्रमांक एक भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना सध्या सुरू असल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत कारखाना बंद केला नाही, अशी टीका सोशल मीडियावर होत होती. या बाबत कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना अंतर्गत शेतकऱ्यांचा पाच हजार टन ऊस शिल्लक आहे. या उसाचे गाळप दोन दिवसात झाल्यानंतर कारखाना बंद होईल अशी माहिती दिली.

भाऊराव चव्हाण उद्योगसमूहाच्या तीन कारखान्यांपैकी हिंगोली जिल्ह्यातील (युनिट क्रमांक चार डोंगरकडा) भाऊराव सहकारी साखर कारखाना तसेच (युनिट क्रमांक दोन) हदगाव तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हडसणी हे दोन कारखाने यापूर्वीच बंद झाले आहेत परंतु अर्धापूर तालुक्यातील देगाव येथे असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक एक हा कारखाना सध्या सुरू असल्याने सोशल मीडियावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले जात होते कोरोना विषाणू संदर्भात शासनाने लाॕकडाऊन केल्यानंतरही भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना सुरू असल्याचे सांगत तेथील कर्मचाऱ्यांना तसेच ऊसतोड कामगारांना बाधा पोहोचेल अशी टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून होत होती. 

हेही वाचा -  संचारबंदीत नांदेड गोळीबाराने हादरले, एक ठार, दोन गंभीर.

कारखाना अंतर्गत शेतकर्यांचा पाच हजार टन ऊस शिल्लक

याबाबत कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके यांच्याशी सकाळी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की भाऊराव सहकारी साखर कारखाना अंतर्गत शेतकर्यांचा पाच हजार टन ऊस शिल्लक आहे. हा ऊस दोन दिवसात गाळप झाल्यानंतर कारखाना बंद करण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक ठेवून कारखाना बंद करणे चुकीचे होईल यासाठी साखर कारखाना प्रशासनाने कर्मचारी तसेच कामगारांसाठी  प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवून काम सुरू असल्याचे सांगितले.

कारखान्यातील 40% कर्मचारी कपात करण्यात आली आहे

यासोबतच कारखान्यातील 40% कर्मचारी कपात करण्यात आली आहे उर्वरित कर्मचाऱ्यांना मास्क रुमाल तसेच स्वच्छतेच्या बाबतीत जागृती करून काम करण्यात येत आहे. आवश्यक तेवढे कर्मचारी ठेवून त्यांना आजार प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी मास्क रुमाल तसेच स्वच्छतेविषयी जागृती करण्यात आली आहे दोन दिवसात उसाचे गाळप झाल्यानंतर हा कारखाना बंद करण्यात येणार असल्याचे श्री तिडके यांनी सकाळची बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Bhaurao Chavan' sugar factory to close - Tidke nanded news.