विधवा महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

बिडकीन - बिडकीन (ता. पैठण) येथील मारवाडी गल्लीमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना "तुमचे दुःख दूर करतो, तुझ्या अंगात देवीचे वारे आहे, ते काढून देतो. लग्न करतो,' असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबास येथील पोलिसांनी बुधवारी (ता. 15) अटक केली.

बिडकीन - बिडकीन (ता. पैठण) येथील मारवाडी गल्लीमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना "तुमचे दुःख दूर करतो, तुझ्या अंगात देवीचे वारे आहे, ते काढून देतो. लग्न करतो,' असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबास येथील पोलिसांनी बुधवारी (ता. 15) अटक केली.

बिडकीन येथे कुटुंबासमवेत राहणारी विधवा महिला (वय 35) तीन वर्षांपूर्वी या भोंदूबाबाच्या संपर्कात आली. पतीच्या निधनानंतर प्रकृती ढासळलेल्या या महिलेला स्वयंघोषित महाराज नारायण बाबूदास वैष्णव याने जाळ्यात ओढले. "मी तुला बरे करतो. तुझ्या अंगात तुळजाभवानी देवीचे वारे असून, ते काढावे लागेल,' असे सांगून त्याने सलगी वाढविली. लिंबू, टाचणी, गुलाल, नारळ, खिळे आणण्यास सांगितले. ते आणल्यानंतर त्यावर बसवून त्याने कुंकू लावले व पाठीवर फटके मारले. मंत्र भारलेले पाणी तो पिण्यास देत असे. त्यावेळी विधवा महिलेची आई सोबत राहत असे. तुझ्या शरीरातील दुःख काढायचे असेल तर तुला माझ्या पवित्र आत्म्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील. मी तुझ्याशी लग्न करीन, असे आमिष दाखवून त्याने ऑगस्ट 2013 पासून ते ऑक्‍टोबर 2015 पर्यंत या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. त्यादरम्यान त्याने या महिलेच्या एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत असलेल्या लहान बहिणीलाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. तुझ्या अंगात कोल्हापूरच्या देवीचे वारे आहे, असे म्हणत तिलाही मंत्राने भारलेले पाणी, लिंबाचे पाणी तो पिण्यास देत असे. डॉक्‍टर होत असलेल्या या विद्यार्थिनीला तो देवाच्या ठिकाणी घेऊन जात असे. दरम्यान, विधवा महिलेचा त्याने दोनवेळा गर्भपात केला. लग्नाचे दाखवलेले आमिष, जादूटोण्याचा दबाव यामुळे भीतीपोटी पीडित महिला पोलिसांत तक्रार करण्यास आतापर्यंत धजावली नाही. तो या महिलेस धमक्‍याही देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून या विधवा महिलेने बुधवारी या भोंदूबाबाविरुध्द बिडकीन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी नारायण बाबूदास वैष्णव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक सिध्दार्थ गाढे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: bhondubaba arrested