बिबी का मकबऱ्याच्या संवर्धनाला लागेना मुहूर्त

संकेत कुलकर्णी
सोमवार, 22 जुलै 2019

प्लास्टर उखडले, गवताचे साम्राज्य
घुमटावर आणि कारंजांच्या हौदांमध्ये झाडे उगवली आहेत. घुमटाचे संगमरवरी दगड निखळत आहेत. बगिचातील पदपथांवर शहरातल्या रस्त्यांसारखेच खड्डे पडले आहेत. मनोरे काळवंडले आहेत. वाढलेले गवत, कचरा आणि पर्यटकांनी फेकलेले अन्न खाण्यासाठी मकबऱ्यात भटक्‍या कुत्र्यांचा वावरही असतो.

औरंगाबाद - जगप्रसिद्ध बिबी का मकबऱ्याच्या संवर्धनाचे शास्त्रशुद्ध काम करण्यासाठी पुरातत्व खात्याला कुशल कारागीरच मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे पडझड सुरू असतानाही हातावर हात ठेवून बसण्याशिवाय पुरातत्व खात्याला पर्याय राहिलेला नाही. महासंचालकांनी दम भरल्यानंतरही दोन वर्षे भिजत घोंगडे पडल्यामुळे मकबऱ्याची अवस्था बिकट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

‘दख्खनचा ताज’ म्हणून ओळख असलेल्या बिबी का मकबऱ्याची स्थिती पाहून पर्यटक हळहळ व्यक्त करतात. काळवंडलेले मनोरे, उखडलेले प्लॅस्टर आणि पर्यटकांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या बिबी का मकबऱ्याची दुरवस्था प्रत्यक्ष पाहून दोनेक वर्षांपूर्वी पुरातत्व महासंचालक डॉ. उषा शर्मा संतापल्या होत्या. त्यांनी कानउघाडणी केल्यानंतर पुरातत्व विभाग मकबऱ्याचे संवर्धन करण्यासाठी झपाटून कामालाही लागला होता. मात्र, अपेक्षित दर्जाचे काम करण्यासाठी कारागीरच मिळत नसल्याने पायऱ्यांजवळ जुजबी मलमपट्टी करून अधिकारी हातावर हात ठेवून बसले आहेत. 

संवर्धनाच्या कामाचे अंदाजपत्रक दोन वर्षांपूर्वीच मंजूर होऊन निविदा जाहीर झाली होती. मात्र, कुणीही काम करायला पुढे आले नाही. पुरातत्व विभागाच्या निकषांत चुन्यातील दर्जेदार काम करणारे लोक मुळात कमी असल्याचे कारण सांगितले गेले. याला स्थानिक गोंधळाची जोड मिळत असल्यामुळेच हे काम रखडल्याचे सूत्रांनी सांगितले. येथे कामांची यादी आणि अंदाजपत्रक दिल्लीदरबारी मंजुरीसाठी पाठविले आहे. योग्य कारागीर आणि दिल्लीची मंजुरी मिळताच या कामाला सुरवात होईल, असे पुरातत्व अधीक्षक डॉ. दिलीपकुमार खमारी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bibi Ka Maqbara Promotion Issue