बीदर कारागृहातून फरार गुन्हेगाराला अटक 

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 10 March 2020

अनेक घरफोड्या केलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या चोरट्यांकडून दोन लाख ८० हजाराचा ऐवज जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुखेड तालुक्यात रविवारी (ता. आठ) रात्री केली. 

नांदेड : कर्नाटक राज्यातील बीदर येथील कारागृहातून फरार होऊन नांदेड जिल्ह्यातील काही चोरट्यांच्या टोळीत सहभागी होऊन अनेक घरफोड्या केलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या चोरट्यांकडून दोन लाख ८० हजाराचा ऐवज जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुखेड तालुक्यात रविवारी (ता. आठ) रात्री केली. 

नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले होते. घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत असल्याने चोरट्यांना अटक करा अशा सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सर्व ठाणेदार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिल्या. यावरून श्री. चिखलीकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल नाईक यांच्या पथकाला मुखेड तालुक्यात गस्त घालण्यास पाठविले. 

मंग्याळ तांडा (ता. मुखेड) येथे सापळा

श्री. नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुखेड तालुक्यात गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मंग्याळ तांडा (ता. मुखेड) येथे सापळा लावून एका दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना थांबविले. त्यांच्याकडील दुचाकीचे कागदपत्र मागितले असता कुठलेही कागदपत्र नव्हते. त्यांची नामदेव रामिकशन भोसले रा. मंग्याळ तांडा व कृष्णा शिंदे यांची अधिकची विचारपूस केली असता कृष्णा बाबू शिंदे रा. खेरडा ता. औराद, जिल्हा बिदर येथील राहिवाशी असल्याचे समजले. 

हेही वाचापिकविमा मंजुरीतील तफावतीमुळे शेतकऱ्यांत नाराजी

दोन लाख ८० हजाराचा ऐवज जप्त 

तो बिदर कारागृहातून फरार असल्याचे समजले. या दोघांनी अन्य तिघांच्या मदतीने नांदेड जिल्ह्यातील नायगाव, लालवंडी, होटाळा, सुजलेगाव, रुई, मरखेल आदी ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक चोरीची दुचाकी (एमएच२४-एएच-९३४९)  व ६९ ग्राम सोन्याचे आणि ३५ तोळे वजनाचे चांदीचे दागिणे असा दोन लाख ८० हजाराचा ऐवज जप्त केला.

आरोपींना नायगाव पोलिसांच्या स्वाधीन
  
त्यांना नायगाव शहर व तालुक्यातील घरफोडीच्या प्रकरणात नायगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्याकडून अजून काही जिल्ह्यातील घरफोडी व अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी व्यक्त केली. 

२२ गुन्हे उघडकीस, ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त 

मागील तीन महिण्यापासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी चोरी व घरफोडी असे २२ गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या पथकांचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी अभिनंदन केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bidar prisoner arrested absconding nanded news.