अबब... औरंगाबादमधील एक खड्डा तब्बल तीन हजारांचा

माधव इतबारे
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

महापालिकेला लागणार पॅचवर्कसाठी कोट्यवधी रुपये 

औरंगाबाद - शहरातील डांबरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यासाठी महापौरांची घाई सुरू असून, मंगळवारी (ता. 20) पुन्हा एकदा पॅचवर्कचा आढावा घेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा बजावण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. दरम्यान, एक खड्डा बुजविण्यासाठी सुमारे अडीच ते साडेतीन हजारांपर्यंत खर्च अपेक्षित असल्याचे बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रिमझिम पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. मुख्य रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांतून वाट काढताना अनेकवळा वाहनांचे अपघातही होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पॅचवर्क सुरू करण्यासाठी महापौरांनी अधिकाऱ्यांकडे तगादा सुरू केला आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे कोणी काम घेण्यास तयार नाही. त्यामुळे शासन निधीतून शहरात रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना पॅचवर्कसाठी साकडे घातले जात आहे. दरम्यान, दोन कंत्राटदारांनी पॅचवर्क करण्याची तयारी दर्शविली आहे; तर एका कंत्राटदाराची निविदा मंजूर आहे; मात्र संबंधित कंत्राटदार काम करण्यास तयार नसल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. काम करायचे नाही तर कंत्राटराने निविदा घेतली कशाला? असा प्रश्‍न करीत नोटीस बजावण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. दरम्यान, एक खड्डा बुजविण्यासाठी सरासरी अडीच ते साडेतीन हजार रुपये खर्च येईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. 
 
साडेतीन हजार खड्डे! 

मेयर फेलोंना शहरात किती खड्डे आहेत, याची पाहणी करण्याची सूचना महापौरांनी केली होती. त्यांनी वॉर्ड अभियंत्यांकडून माहिती घेत महापौरांना अहवाल सादर केला आहे. त्यानुसार शहरात तीन हजार 429 खड्डे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेला शहरातील खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये लागणार आहेत. 
  
स्त्यांच्या कामात पॅचवर्कचा समावेश 
 शंभर कोटींच्या रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी पॅचवर्क केल्यास रस्त्यांच्या कामातच ऍटम वाढविले जातील, त्यामुळे कंत्राटदारांचे नुकसान होणार नाही, असे यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Billions Rupees paid for Pits patchwork