
कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून गावातील पॅनेल प्रमुखांना फोनकॉल करून कोंबडीच्या दराचे काहीतरी होईल तुम्ही फक्त मागणी नोंदवा अशी विनंती केली जात आहे.
निलंगा (जि.लातूर) : पाच राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली. त्याचा परिणाम स्थानिक कुक्कुटपालन व्यवसायावर झाला आहे. यामुळे कोंबडी, अंडी यांची मागणी घटली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खवय्या असलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून गावातील पॅनेल प्रमुखांना फोनकॉल करून कोंबडीच्या दराचे काहीतरी होईल तुम्ही फक्त मागणी नोंदवा अशी विनंती केली जात आहे. तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना पार्ट्यांचे नियोजन केलेले होते. पण, आता बर्ड फ्लूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मटणाची पार्टी नको रे बाबा असे कार्यकर्ते म्हणत आहेत.
मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा
एकप्रकारे ही साथ उमेदवारांच्या पथ्यावरच पडली आहे. यामुळे त्यांच्या खर्चात कपात होणार आहे. सध्या शहरासह ग्रामीण भागात बर्ड फ्लूची भीती आहे. बाजारातील कोंबड्याचे दर गडगडले आहेत. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना खूश करण्यासाठी देण्यात येणाऱ्या कोंबडा पार्टीत पोल्ट्री व्यापाऱ्याकडून फक्त तुम्ही कॉन्टिटी कळवा आम्ही घरपोच कोंबड्या पाठवतो, असे सांगितले जात आहे.