esakal | Bhandara Hospital Fire : भंडारा घटनेच्या अहवालानुसार कारवाई होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
sakal

बोलून बातमी शोधा

4rajesh_tope

राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Bhandara Hospital Fire : भंडारा घटनेच्या अहवालानुसार कारवाई होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाला आग लागल्यामुळे दहा बालकांच्या मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत समितीच्या अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर या प्रकरणात जबाबदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमानिमित्त औरंगाबादेत टोपे आले. त्यावेळी ते बोलत होते. भंडारा सारखी घटना टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक रुग्णालयांना फायर ऑडीट, स्ट्रक्चरल व इलेक्ट्रीकल ऑडीट आम्ही करणार आहोत. अशा घटना घडू नये, घडल्यास येणाऱ्या संकटांना सक्षमपणे सामोरे कसे जावे याबाबत रुग्णालयातील संबंधितांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.


राज्यातील एकूण शासकीय इमारतींपैकी जवळपास १५ टक्के इमारती या आरोग्य विभागाच्या आहेत. या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीचीही गरज आहे. या इमारतींच्या तुलनेत १५ टक्के निधी मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, रिपेअरिंग आणि मेटेनन्स ही जबाबदारीही विभागप्रमुखांचीच आहे, असे टोपे म्हणाले. शासकिय रुग्णालयातील देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. त्यांच्याकडील निधीच्या उपलब्धतेनूसार आम्हालाच नव्हे तर शासनाच्या प्रत्येक विभागाला अवलंबुन राहावे लागते. रुग्णालयांना प्राधान्यक्रम दिला तर अशी कामे तात्काळ होतील असेही ते म्हणाले.

जोडणी लूज असल्याने आग?
भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेली आग ही वायरींग लूज असल्याने लागली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोन ठिकाणी आग लागली व धूर झाला तो प्रकार लवकर लक्षात न आला नसावा. अशी शक्यता टोपे यांनी व्यक्त केली.


औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

रात्रीतून बदलली समिती : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणाची चौकशीसाठी शनिवारी शासनाने आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. परंतु रात्रीतून ही समिती बदलण्यात आली. त्याऐवजी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार हे या समितीचे अध्यक्ष असतील. अग्निशमन दलाचे संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता या समितीत आहेत. समिती दोन ते तीन दिवसांत अहवाल सादर करेल असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

जिल्हा रुग्णालयात देणार लस
आगामी दोन ते तीन महिन्यात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात कोरोना लस देण्याचे निश्चित झाले आहे. जिल्हा रुग्णालयात जास्त गर्दी होणार असेल तर उप जिल्हा आरोग्य केंद्रावर लसीकरणाचा कार्यक्रम होणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

Edited - Ganesh Pitekar