सातशे वर्षांची परंपरा असलेली बिरूदेव यात्रा रद्द; उमरग्यात साध्या पद्धतीने उत्सव

अविनाश काळे
Wednesday, 11 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिर समितीचा निर्णय

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा - लातूर मार्गावरील श्री. क्षेत्र बिरुदेव मंदिराची प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी-पाडव्याला संपन्न होणारी यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे रद्द करण्यात आली आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दरम्यान सातशे वर्षाची परंपरा असलेली यात्रा महोत्सव पहिल्यांदाच रद्द झाल्याने आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील असंख्य भाविकांना यंदा दर्शनाचा लाभ मिळणार नाही. दिवाळीच्या पाडव्याच्या मुहुर्तावर धनगरवाड्यातील देवघरातुन निघालेल्या श्री. बिरुदेवाच्या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्र, कर्नाटक राज्यासह आंध्रप्रदेशातील हजारो भाविक मोठ्या श्रध्देने व उत्साहाने सहभागी होतात. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शनिवारपासुन (ता. १४) यात्रा महोत्सवाला सुरूवात होणार आहे. मंदिरातून पालख्याचे आगमन, सोमवारी (ता.१६) शहरातील धनगर वाड्यातील देवघरातून श्री च्या काठी व पालखी मिरवणूक तर मंगळवारी (ता. १७) बिरूदेव यात्रा असे कार्यक्रम होणार होते परंतू कोरोनाच्या भयावह स्थितीमुळे यात्रा महोत्सव करणे संयूक्तीक होणार नसल्याने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून मंदिर समितीने यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात होणारे नैवेद्य दाखविणे, बाशिंग चढविणे, मंदिराभोवती छबिना मिरवणूक आदी धार्मिक विधी केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत केले जाणार असल्याने भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये असे आवाहन बिरूदेव मंदिर समितीने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birudev Yatra canceled with seven hundred years tradition