लातूर येथे आघाडी सरकार विरोधात भाजपचा एल्गार

BJP Agitation Against Mahavikas Aghadi Latur
BJP Agitation Against Mahavikas Aghadi Latur

लातूर ः जनतेचा विश्‍वासघात करून राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने केवळ फसव्या घोषणा केल्या आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून कायदा व सुव्यवस्था ढासळलेली असून महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा घोषणा देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्‍यांची फसवी कर्जमाफी केलेली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या हिताच्या निर्णयांना स्थगिती देत केवळ स्वतःचा स्वार्थ साधून सरकारमधील मंत्री सत्कार स्विकारत आहेत.

या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता.२५) एल्गार धरणे आंदोलन करण्यात आले. लातूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर हे आंदोलन झाले. या आंदोलनाचे नेतृत्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश कराड व शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी केले. या सरकारने शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी देत त्यांच्या अनेक समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. रब्बी हंगामाकरीता पीक विमा कंपनीची नियुक्ती न करता सरकारने शेतकऱ्‍यांना अधिक अडचणीत ढकलण्याचे काम केले आहे. गेल्या काही महिनाभरात तर राज्यातील विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासाळलेली आहे. याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपच्या वतीने एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.


या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रमेश कराड, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे, खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, स्थायी समिती सभापती दिपक मठपती, देविदास काळे, नगरसेवक स्वाती घोरपडे, दीपा गीते, प्रेरणा होनराव, मंडल प्रमुख गणेश हेड्डा, रवी सुडे, ज्योतीराम चिवडे, प्रविण कस्तुरे, ॲड. दिग्विजय काथवटे, लातूर तालुकाध्यक्ष बंसी भोसले , महिला आघाडीप्रमुख मीना भोसले, शोभा कोंडेकर, सुवर्णा येलाले, निर्मला कांबळे, आफरीन शेख, संध्या जैन, तालुका महिला आघाडी अध्यक्ष अलका कदम आदी सहभागी झाले होते.


महाविकास आघाडीचे सरकार खोटारडे आहे. कर्जमाफीतून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. महिलावरील अत्याचार वाढले आहेत. पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लातूरच्या पाण्याचे खापर भाजपवर फोडले जात आहे. पण आमच्या काळात एकदाही वीज तोडण्यावरून पाणी बंद झाले नव्हते. कारभार नीट करता येईना पण खापर मात्र आमच्यावर फोडले जात आहे. आमच्यावर खापर कशाला फोडता. या प्रश्नी सत्ताधारी गंभीर नाहीत.
- सुधाकर शृंगारे, खासदार.

सत्तेत आल्यास महिनाभरात उजनीचे पाणी देऊ, अशी घोषणा याच सरकारमधील लातूरच्या मंत्र्याने केली होती. मात्र दोन महिने झाले तरी याबाबत कोणतेच भाष्य न करता उजनीच्या पाण्याचा आम्ही अभ्यास करीत आहोत, असे सांगून ही जबाबदारी राज्यमंत्र्यांवर ढकलून हात वर केले आहेत. जलाशयांमध्ये पाणी असतानाही केवळ विद्युत देयक न भरल्यामुळे लातूरकरांना पंधरा दिवसांपासून निर्जळीला सामोरे जावे लागत आहे. अशा फसव्या मंत्र्यांच्या फसव्या घोषणांविरोधात आमचा हा एल्गार आहे.
- रमेश कराड, जिल्हाध्यक्ष, भाजप
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com