भाजप नेत्यानेच पाच एकरातील पिकावर फिरवला नांगर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

शेतातील लावलेले वांग्याचे पिकं ट्रॅक्टर लावून अक्षरशः उखडून टाकले आणि शेतमालाला, भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. वानखेडे यांनी पाच एकरातील वांग्याचे पिक काढून भाजपलाच घरचा आहेर दिल्याचे दिसत आहे.

नांदेड : एकीकडे शेतमालाला भाव मिळत नसल्याने राज्यासह देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्य़ातील हदगाव तालुक्यातील भाजपाचे नेते तथा माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शेतात घेतलेल्या वांग्याचे भाव कवडीमोल झाल्याने आपल्या शेतातील पाच एकर वरील वांगे ट्रॅक्टर लावून उखडून टाकले.

शेतमालाला भाव मिळत नाही. भाजप सरकारने सत्तेत दिलेल्या आश्वासनांना बगल दिली असल्याने देशभरातील शेतकरी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. तसेच शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नाही. अशातच, मुळ शेतकरी असलेले माजी खासदार तथा भाजप नेते सुभाष वानखेडे यांनी पाच एकरात वांगे पिकाची लागवड केली होती. मात्र, हजारो रुपये खर्च करुन ही वांग्याला बाजारात प्रति किलो तीन ते पाच रूपये भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या वानखेडे यांनी शेतात ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय घेतला.

शेतातील लावलेले वांग्याचे पिकं ट्रॅक्टर लावून अक्षरशः उखडून टाकले आणि शेतमालाला, भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. वानखेडे यांनी पाच एकरातील वांग्याचे पिक काढून भाजपलाच घरचा आहेर दिल्याचे दिसत आहे.

Web Title: BJP leader destroy crop in Nanded