नांदेडला भाजप-शिवसेना युती होणार !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

नांदेड : जिल्हा परिषद  निवडणुकीत  नांदेड जिल्ह्यात  भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होण्याची चिन्हे आहेत मात्र जागावाटपाचा अडथळा पार झाल्यावरच युतीवर शिक्कामोर्तब होणार आहे . 

नांदेड : जिल्हा परिषद  निवडणुकीत  नांदेड जिल्ह्यात  भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होण्याची चिन्हे आहेत मात्र जागावाटपाचा अडथळा पार झाल्यावरच युतीवर शिक्कामोर्तब होणार आहे . 

नांदेड जिल्हा परिषदेवर स्थापनेपासून कॉंग्रेसची घट्ट पकड आहे. या वेळी तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद अशाेक चव्हाण यांच्या रुपाने नांदेडकडे आहे. त्यामुळे ते जिल्हा परिषद काँग्रेसकडे राखण्यासाठी जोर लावणार हे निश्चित आहे .  दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीत राज्यात भाजपला चांगले यश मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवती झाल्या आहेत; मात्र नांदेडचा विचार केला, तर ग्रामीण भागात भाजपची ताकद फारच मर्यादित स्वरुपात आहे. किंबहूना अशा परिस्थितीत सत्तेसाठी किमान २५ ते ३० जागा जिंकण्याचे आव्हान भाजपला पेलणे अशक्यप्राय आहे. सत्तेचा हा साेपान चढायचा असेल, तर शिवसेनेबराेबर युती करण्यावाचून पर्याय नाही, हे आेळखून स्थानिक पातळीवर युतीचे घाेडे भाजपकडून दामटले जात आहे. त्यादृष्टीने समविचारी पक्षांच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक यापूर्वीच पार पडली आहे. 

मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर पुन्हा दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी ज्या पक्षाची ज्या भागात पकड जास्त आहे त्या पक्षाला तेथील जागा सोडण्याच्या जुन्याच फाॅर्मुल्यावर एकमत करुन युतीवर शिक्कामाेर्तब करण्यात आले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला श्री. खतगावकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी खासदार डी. बी. पाटील, शहराध्यक्ष संतुक हंबर्डे, आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार अविनाश घाटे, तर शिवसेनेकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, सुभाष साबणे यांच्यासह प्रकाश कौडगे, जिल्हाध्यक्ष भुजंग पाटील, बाबूराव कदम, मिलिंद देशमुख, धोंडू पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित हाेते. 

तब्बल सहा तास युती आणि जागा वाटपावर चर्चा झाली. बराच वेळ काथ्याकूट झाल्यानंतर जुनाच फार्म्यूला स्वीकारत ज्या पक्षाची ज्या भागात ताकद जास्त त्या पक्षाला त्या भागात झुकते माप असे ठरले. दाेन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत पत्रकारांना याची माहिती देण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

२० टक्के जागावर वादाचा मुद्दा

चर्चेच्या पुढील फेरीत इतर मित्र पक्षांशीही चर्चा करून जागा वाटपाचा तिढा सोडण्यात येणार असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार देण्यात येतील. या बैठकीत ८० टक्के चर्चा सकारात्मक झाली. २० टक्के जागांवर वाद आहे. ताे नंतरच्या बैठकीत साेडवला जाईल. कोणता गट आणि गण कोणत्या पक्षाला सोडायचा हेही आगामी बैठकीत ठरविले जाईल, असे ठरल्याचे सांगण्यात आले.

Web Title: bjp sena to go hand in hand in nanded