भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला राष्ट्रवादीत उमेदवारी

सयाजी शेळके
बुधवार, 2 मे 2018

श्री. मुंडे म्हणाले की, रमेश कराड यांचे भाजपच्या पक्षविस्तारात मोठे योगदान आहे. (कै.) गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी लातूर जिल्ह्यात मोठ्या हिंमतीने काम केले आहे.

उस्मानाबाद - पक्षाचे निष्ठेने काम करूनही रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने टाळाटाळ केली. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली आहे. आघाडीसाठी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. आघाडी झाली अथवा नाही झाली तरीपण, उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राष्ट्रवादी भवनमध्ये बुधवारी (ता. 2) झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. मुंडे बोलत होते. आमदार अमरसिंह पंडीत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सतीश चव्हाण, रमेश कराड, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनवणे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह लातूर, बीड, उस्मानाबादमधील नेते यावेळी उपस्थित होते.

श्री. मुंडे म्हणाले की, रमेश कराड यांचे भाजपच्या पक्षविस्तारात मोठे योगदान आहे. (कै.) गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी लातूर जिल्ह्यात मोठ्या हिंमतीने काम केले आहे. उमेदवारीसाठी मात्र त्यांना डावलले. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना पक्षात घेत उमेदवारी दिली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना हा धक्का आहे. कराड यांच्या प्रवेशाने लातूर जिल्ह्यासह तिन्ही जिल्ह्यांत पक्षाची ताकद वाढणार आहे. 2014 नंतर राष्ट्रवादी सोडून गेलेल्याच्या पदरी केवळ निराशा आली आहे. त्यांचे आता पुन्हा कमबॅक होत आहे. बीडमधील काही आघाड्यांची मतेही राष्ट्रवादीच्या पारड्यात येणार आहेत. आघाडी शेवटच्या टप्प्यात होत असते. काँग्रेससोबत आघाडीची चर्चा सुरू आहे. आघाडी झाली अथवा नाही झाली तरी संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादीचा या जागेवर निश्चित विजय होईल, असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु भाजपकडून उमेदवारी देण्याचे निश्चित नव्हते. पंकजा मुंडे यांच्याकडेही विचारणा केली. परंतु अन्याय होत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीकडे जाण्याचा निर्णय घेतला. - रमेश कराड, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: BJPs loyalist worker has given candidacy to the NCP