esakal | पाठलाग करुन पकडलेल्या ट्रकमध्ये निघाला काळ्या बाजारात जाणारा तांदूळ 
sakal

बोलून बातमी शोधा

JTR20A00340

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गरीब लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी आलेला सहा टन तांदूळ चोरीच्या मार्गाने एका आयशर ट्रकमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना जिंतूर पोलिसांनी पाठलाग करून पकडला. ही कारवाई शनिवारी (ता.दहा) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. 

पाठलाग करुन पकडलेल्या ट्रकमध्ये निघाला काळ्या बाजारात जाणारा तांदूळ 

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

जिंतूर ः सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गरीब लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी आलेला सहा टन तांदूळ चोरीच्या मार्गाने एका आयशर ट्रकमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना जिंतूर पोलिसांनी पाठलाग करून पकडला. ही कारवाई शनिवारी (ता.दहा) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. 

जमादार अनिल इंगोले व राजकुमार पुंडगे हे गस्तीवर असताना त्यांना याबाबतची गुप्त माहिती मिळाली. ज्यात आयशर ट्रक (क्रमांक एमएच २०, ईजी ८५२८) मधून सार्वजनिक वितरण प्रणालीचा स्वस्त धान्य दुकानांना वितरित करण्याकरिता आलेला तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात आहे. त्यावरून हे दोन्ही पोलिस कर्मचारी औंढा मार्गावरील पाचेगाव येथे रस्त्यावर थांबले असता संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदरील क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने जिंतूरकडे येत असताना दिसला. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने न थांबता सदरील वाहन जिंतूरकडे भरधाव वेगाने पळवून नेले. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचा पंधरा किलोमीटर पाठलाग करून त्यास शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ थांबवून वाहनात असलेल्या धान्याबद्दल विचारपूस केली असता वाहन चालक शेकू सज्जन पल्हाळ (रा.पिपळगाव ता.फुलंब्री) याने सांगितले की सदरील सहा टन तांदूळ जवळाबाजार येथून औरंगाबादकडे घेऊन जात आहे. सदरील तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी आलेला असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तो पकडून पोलिस ठाण्यात आणून उभा केला. 

हेही वाचा - परभणी जिल्हा; खरिपाच्या उरल्यासुरल्या आशा परतीच्या पावसाने संपुष्टात

महसूल विभागाला पत्र दिले 
शहर पोलिसांनी कामगिरी करत काळ्या बाजारात जाणारा सहा टन तांदूळ राशनचा असल्याच्या संशयावरून पकडला असून याबाबत महसूल विभागाला पत्र दिले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सांगितले. 

हेही वाचा - लोअर दूधनाचे सहा दरवाजे उघडले, चार हजार ३८६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग

सेलूत वाईन शॉपच्या नोकरांना अडवून मारहाण 
सेलू : शहरातील स्टेशन रस्त्यावर असलेल्या भुतडा वाईन शॉपच्या दोन नोकरांना घरी रक्कम घेऊन जाताना यशवंत विद्यालयाच्या रस्त्यावर शनिवारी (ता.१०) सायंकाळी साडेसात वाजता लुटण्याचा दोन अज्ञात दुचाकीवरून येणाऱ्यांचा प्रयत्न फसला. या दोघा नोकरांना चोरट्यांनी जबर मारहाण केली; मात्र जवळ असलेले एक लाख ४० हजार रुपये अज्ञात चोरट्यांच्या हाती लागू दिले नाही. चोरटे मारहाण करत असताना उभयतांच्या परिचयाच्या तरुणांनी चोरट्यांना पकड्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांचे शर्टच हातात आल्याने चोरटे दुचाकीवरून पसार झाले. भुतडा वाईनचे वितरक भुतडा बंधू यांच्या दुकानावरील नोकर ज्ञानेश्वर मगर, गणेश क्षीरसागर नेहमीप्रमाणे सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर दोघेजण आपल्या दुचाकीवरून मालक काबरा यांच्या घरी सोबत घेतलेले एक लाख ४० हजार रुपये घेऊन जात असताना चोरट्यांनी दुचाकीवरील असलेल्या ज्ञानेश्वर मगर लाकडाने फटका मारताच दुचाकी खाली पडताच दिव्यांग मगर जबर मारहाण केली. हा प्रकार यशवंत विद्यालयाच्या वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असताना उभयतांनी मदतीसाठी आरडाओरडा केली असता रस्त्यावरून जाणाऱ्या सहकाऱ्याने मारहाण करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना ते दोघेही दुचाकीवरून पसार झाले. ज्ञानेश्वर मगर हा अपंग असून त्याचा मारहाणीत एक कान तुटला. जीव धोक्यात घालून रक्कम मात्र न सोडल्याने चोरट्यांनी केलेला लुटीचा प्रयत्न फसला. या दोघांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर गणेश क्षीरसागर याने दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांच्या विरोधात सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक विजय रामोड करत आहेत. 

संपादन ः राजन मंगरुळकर