अंध पित्याने दाखवला "डोळस' शेतीचा मार्ग

Jawar Crop Ahmadpur
Jawar Crop Ahmadpur

अहमदपूर (जि.लातूर) ः डोळे आल्याचे निमित्त झाले आणि वय वर्ष एक असताना पूर्ण अंधत्व आले. ही घटना आहे लिंगधाळ (ता.अहमदपूर) येथील 70 वर्षीय गोरखनाथ गोपाळ येलगट्टे या शेतकऱ्याची.शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंगधाळ येथे गोरखनाथ यांना वडिलोपार्जित 40 एकर शेती आहे. वयाच्या पहिल्याच वर्षी अंधत्व आले असतानाही सालगडी ठेवून त्यांनी वर्ष 2000 पर्यंत शेती केली. स्वतः त्यांनी पेरणी, तण काढणे, ज्वारी कापणी, बैल चारणे आदी कामे केली आहेत.


लौकिक अर्थाने गोरखनाथ यांचे शिक्षण झाले नसले, तरी ते काकडा, हरिपाठ, भजने म्हणतात. त्यांना संपूर्ण उजळणीही पाठ आहे. शेतीपासून त्यांचे घर अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. परंतु कोणाच्याही मदतीशिवाय काठीच्या साहाय्याने आजही ते शेतात येतात. थोरलेवाडी (ता.अहमदपूर) येथील मथुरा यांच्याशी त्यांचे लग्न झाले असून, त्यांना एक मुलगी व अंगद आणि धनंजय ही दोन मुले आहेत.

वर्ष 2000 पासून त्यांचा दहावी उत्तीर्ण अंगद आणि पदवीधर असणारा धनंजय हे शेती करतात. अर्थात वेळोवेळी व आवश्‍यक तेथे गोरखनाथ यांचे त्यांना मार्गदर्शन असतेच. वडिलांनी सांगितल्यामुळे 40 एकर शेतीपैकी आठ एक्कर पडीक असणाऱ्या शेतीवर वर्ष 2011-12 मध्ये अंगद आणि धनंजय यांनी जवळपास चार हजार ट्रॅक्‍टर भरून गाळ टाकला. आजवर तेथे तूर व सोयाबीन या पिकांचे उत्पादन घेतले. मात्र 2019 च्या ऑक्‍टोबर महिन्यात त्यांनी पाच एकरांवर जोंधळ्याची (बडी ज्वारी), तर तीन एकरांवर हरभऱ्याची लागवड केली आहे. सद्यःस्थितीत दोन्हीही पिके जोमात आहेत.

याबरोबरच एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत अंगद आणि धनंजय यांनी शेतात शेततळी निर्माण केली आहेत. या दोन्ही शेततळ्यात मिळून सद्यःस्थितीत जवळपास साडेतीन हजार कोटी लिटर एवढा पाणीसाठा आहे. याशिवाय यावर्षी त्यांनी प्रत्येकी अडीच एकरांवर पपई आणि टरबुजाची लागवड केली आहे. शेतात सौरऊर्जा प्रकल्पही राबवला आहे. शेती करत असताना पेरणी यंत्र, रोटर याचा ते वापर करतात. अंध वडिलांनी शेतीच्या दाखवलेल्या "डोळस' मार्गावर दोन्हीही पुत्रांची दमदार वाटचाल सुरू आहे.


वडिलांचे शेतीचे पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेती नेहमीच फायदेशीर ठरली आहे.
- धनंजय येलगट्टे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com