यूपीएससीत यश मिळवलेल्या अंध तरुणाला मिळेना पोस्टिंग

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

यूपीएससीत यश मिळविलेल्या बीडच्या अंध तरुणाला दोन याद्या जाहीर होऊनही पोस्टिंग मिळालेली नाही. केंद्रीय मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाने पत्रव्यवहाराला कसलेही उत्तर न दिल्यामुळे त्याने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे.

औरंगाबाद- यूपीएससीत यश मिळविलेल्या बीडच्या अंध तरुणाला दोन याद्या जाहीर होऊनही पोस्टिंग मिळालेली नाही. केंद्रीय मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाने पत्रव्यवहाराला कसलेही उत्तर न दिल्यामुळे त्याने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे.

अपंगाऐवजी दिव्यांग म्हणा असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सरकारमध्ये मनुष्यबळ व प्रशिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे एका कर्तृत्ववान अंध तरुणाची परवड होत आहे. बीडच्या जयंत मंकले या तरुणाला 75 टक्के अंधत्व आहे. त्यावर मात करत त्याने यूपीएससीच्या परीक्षेत चौथ्या प्रयत्नात 923 वा रॅंक मिळवला. 31 जुलै आणि 14 ऑगस्टला जाहीर झालेल्या दोन याद्यांमध्ये आठपैकी पाच जणांना पोस्टिंग मिळाले. इतर तिघांपैकी दोन जण यासाठी उत्सुक नसल्याचे कळते. यापूर्वी 2015 आणि 2016 मध्ये दोन 100 टक्के अंध तरुणींना पोस्टिंग देण्यात आले. यंदाच्या बॅचचे प्रशिक्षण येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तरीही जयंतला अद्याप पोस्टिंग ऑर्डर न मिळाल्याने त्याचे भविष्य अधांतरी आहे. 

नोकरीची अत्यंत गरज
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात असलेल्या जयंतला नोकरीची अत्यंत गरज आहे. 15 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. संगमनेरला मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी मिळवणाऱ्या जयंतवर वृद्ध आई आणि दोन बहिणींची जबाबदारी आहे. घरात त्याच्याशिवाय कुणीही कमावणारे नाही. वारंवार दिल्लीला खेट्या मारणे किंवा इतर कायदेशीर मदत घेणे त्याला परवडणारे नाही. त्यामुळे स्वबळावर यश संपादन केलेल्या या तरुणावर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

सुप्रिया सुळे यांचाही पाठपुरावा 
खासदार सुप्रिया सुळे यांनी 03 ऑगस्टला पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना ट्विटरवरून जयंतच्या पोस्टिंगबाबत विचारणा केली आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कार्यवाहीचे आश्‍वासन त्यांनी देऊनही 14 ऑगस्टच्या यादीत त्याचे नाव आले नाही. त्यामुळे फॉलोअप घेण्यासाठी जयंत दिल्लीला रवाना होत आहे.

Web Title: The blind youth who got success in UPSC did not posting yet