अश्‍लील व्हिडिओ प्रकरणी आयआयटीचा भावी अभियंता अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

औरंगाबाद - राजस्थानातील जोधपूरस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अभियंत्याला औरंगाबाद सायबर सेलने अटक केली. ही कारवाई ता. सहा डिसेंबरला राजस्थान येथे करण्यात आली. 

औरंगाबाद - राजस्थानातील जोधपूरस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अभियंत्याला औरंगाबाद सायबर सेलने अटक केली. ही कारवाई ता. सहा डिसेंबरला राजस्थान येथे करण्यात आली. 

आर्यश नारायण वशीटा (वय २१, रा. जोधपूर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो जोधपूर येथील आयआयटीमध्ये तीन वर्षांपासून शिक्षण घेतो. शहरातील एका अल्पवयीन मुलीचे इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर अकाऊंट आहे. तिच्या अकाऊंटवर व्हिजिट करून त्याने अश्‍लील छायाचित्र, व्हिडिओ व मजकूर पाठविला होता. ही बाब मुलीने पालकांना सांगून पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच बाललैंगिक शोषणविरोधी कायद्यानुसार तरुणाविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान, सायबर सेलच्या पोलिसांनी तरुणाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याची माहिती संकलित केली. त्यानंतर त्याच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन मिळविले. त्यावेळी तो जोधपूरला असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा पूर्ण पत्ता मिळविल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने राजस्थान गाठून येथील कुडी भागातून त्याला पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक हेमंत तोडकर, नितीन देशमुख, सुदर्शन एखंडे, गोकुळ कुतरवडे यांनी केली.

गलती हो गई साहब...
ज्यावेळी आर्यशला सायबर सेलच्या पोलिसांनी पकडले त्यावेळी थोडे आढेवेढे त्याने घेतले; पण नंतर चूक मान्य केली. पश्‍चात्तापाचे उमाळेही त्याला फुटले. ‘साहब गलती हो गई, माफ करो ना...’ अशी विनवणी तो करीत होता. आर्यशच्या कृत्यामुळे त्याचे पालकही चकित झाले असून त्यांनीही कपाळाला हात मारून घेतला. 

संशयिताला कोठडी
संशयित आर्यशला न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्याला ता. अकरा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अशी माहिती सायबर सेलकडून देण्यात आली.

Web Title: Blue Film Case Engineer Arrested Crime