बीड जिल्ह्यात गर्भवती नवविवाहितेचा मृतदेह आढळला, खुनाचा आराेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील केरूळ (ता. आष्टी) येथील विवाहितेचा मृतदेह आढळून आल्यानंतर नातेवाईकांनी खुनाचा आराेप करून सासरच्या मंडळींना अटक करण्याची मागणी केली. प्रगती काळू साबळे असे मृत विवाहितेचे नाव असून ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समजते. 

आष्टी (जि. बीड) - तालुक्‍यातील केरूळ येथे वीसवर्षीय विवाहिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. बुधवारी (ता. 18) घडलेल्या या संशयास्पद घटनेमुळे खळबळ उडाली असून माहेरकडील नातेवाइकांनी मुलीचा खून झाल्याचा आरोप केला आहे. प्रगती काळू साबळे असे मृत विवाहितेचे नाव असून ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समजते. 

तालुक्‍यातील केरूळ येथे बुधवारी रात्री उशिरा प्रगती काळू साबळे ही नवविवाहिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. गुरुवारी (ता. 19) याची माहिती मिळाल्यानंतर माहेरकडील नातेवाइकांनी केरूळ येथे धाव घेतली. यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी तेथे आलेल्या नातेवाइकांनी मुलीने गळफास घेतला नसून पतीने मारहाण करून तिचा खून केला असल्याचा आरोप केला.

क्‍लिक करा : ऑनलाईन नोकरीच्या अमिषाने गंडा 

पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी, की सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या प्रगती हिला ऊसतोडणीला पाठविण्यास माहेरकडील लोकांचा विरोध होता. मात्र, तरीदेखील विवाहितेचा पती काळू साबळे हा आई, वडील व कुटुंबासह एका कारखान्यावर घेऊन गेला. माहेरच्या लोकांना याची माहिती झाल्यानंतर त्यांनी तिला माहेरी आणल्यानंतर काळू साबळे याने आम्ही गावी केरूळ येथे राहतो, ऊसतोडणीसाठी जाणार नाही, असे सांगितल्यानंतर आठ दिवसांपूर्वीच माहेरच्या लोकांनी प्रगतीस पतीसमवेत केरूळ येथे पाठविले होते.

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले !  

बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास माहेरच्या लोकांचे व प्रगतीचे भ्रमणध्वनीहून बोलणे झाले होते. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास त्यांना प्रगतीच्या मृत्यूची बातमी समजली. यानंतर केरूळ येथे आलेल्या माहेरच्या लोकांनी पतीने मारहाण करून खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. रात्री घटना घडूनही आम्हाला सकाळी का कळविण्यात आले, असे सांगत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 
 

हेही वाचा  :  ‘कल्याण’ बुकीवर आयजींचा छापा 

सहा महिन्यांची होती गरोदर 
शवविच्छेदनानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पोलिसांनी नातेवाइकांना दिल्यानंतर आष्टी येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन पार पडले. यानंतर केरूळ येथे या विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रगती ही सहा महिन्यांची गरोदर असल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of a newlywed woman was found in Beed district

टॅग्स