बाबासाहेबांनी हाताळलेली पुस्तके अन्‌ वस्तू देतात प्रेरणा अन्‌ उभारी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाज घटकांच्या प्रगतीसाठी पीईएसची (पीपल्स एज्युकेशन सोसायटी) स्थापना केली. स्वत: लक्ष घालून त्यांनी केलेले हे अफाट कार्य सदैव प्रेरणा देत आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी हाताळलेली हजारो पुस्तके आणि त्यांनी वापरलेल्या वस्तू आजही जीवनाला उभारी देत आहेत. 

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाज घटकांच्या प्रगतीसाठी पीईएसची (पीपल्स एज्युकेशन सोसायटी) स्थापना केली. स्वत: लक्ष घालून त्यांनी केलेले हे अफाट कार्य सदैव प्रेरणा देत आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी हाताळलेली हजारो पुस्तके आणि त्यांनी वापरलेल्या वस्तू आजही जीवनाला उभारी देत आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अथांग होते, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अफाट काम केले. पीईएसच्या स्थापनेच्या काळात बाबासाहेबांनी स्वत: लक्ष घातले होते. अगदी इमारत कशी असावी, खिडक्‍या कशा असाव्यात, ग्रंथालय कसे असावे, क्‍लासरूम कशा असाव्यात अशा प्रत्येक बारीक-बारीक गोष्टींवर बाबासाहेबांनी काम केल्याचे दिसून येते. मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बाबासाहेबांनी हाताळलेले, अभ्यासलेले एक हजारपेक्षा अधिक ग्रंथ आहेत. धर्मांतरापूर्वी बाबासाहेबांनी हजारो ग्रंथांचा अभ्यास केला. त्यातील अनेक ग्रंथ मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहेत. अनेक पुस्तकांवर बाबासाहेबांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वर्ष 1800 च्या शतकापासूनची जुनी पुस्तके, ग्रंथ जतन करून ठेवले आहेत. बाबासाहेब जेव्हा जेव्हा औरंगाबादेत यायचे तेव्हा तेव्हा त्यांनी हाताळलेल्या अनेक वस्तूही जतन करून ठेवल्या आहेत. बाबासाहेबांचा बिछाना, उशी, रजई, बेडशीट, त्यांच्या खुर्च्या, स्वयंपाकाची भांडी हा जतन केलेला अमूल्य ठेवा आजही प्रेरणा देत आहे. 

ग्रंथांचे डिजिटलायजेशन 
बाबासाहेबांनी हाताळलेले हजारो दुर्मिळ पुस्तके, ग्रंथ आहेत. मात्र, या सर्व ग्रंथांचे योग्य पद्धतीने जतन होण्याची गरज आहे. शतकापूर्वीच्या पुस्तकांची पाने जीर्ण झाली आहेत. अनेक पुस्तकांना हाताळणे शक्‍य होत नाही. बाबासाहेबांचा हा संपूर्ण वैचारिक ठेवा पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावा यासाठी आता डिजिटल पद्धतीने जतन करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम अफाट होते. त्यांनी हाताळला नाही, असा ग्रंथ सापडणे अवघड आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी हाताळलेल्या ग्रंथांना, विविध पुस्तकांना संस्थेने जतन करून ठेवलेले आहे. बाबासाहेबांनी अभ्यासलेले विविध धर्मांची शेकडो पुस्तके या ठिकाणी आहेत. हेच ग्रंथालय दररोज प्रेरणा, जीवनाला ऊर्मी, उभारी देण्याचे काम करीत आहे.'' 
प्रा. डॉ. आर. टी. डेंगळे, ग्रंथपाल, मिलिंद महाविद्यालय 

Web Title: books gives inspiration which touched by Dr. BabaSaheb Ambedkar