वेतनाअभावी अंगणवाडीच्या सेविकेची बोर्डीत आत्महत्या

वेतनाअभावी अंगणवाडीच्या सेविकेची बोर्डीत आत्महत्या

बोरी - अंगणवाडी सेविकेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बोर्डी (ता. जिंतूर) येथे मंगळवारी (ता. सात) सकाळी घडली. कामाबद्दल अधिकाऱ्यांचा दबाव, पाच महिन्यांचे थकलेले वेतन या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. तसा उल्लेख त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आहे. 

सुमित्रा भगवान राखुंडे (वय ५४) असे या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. त्या बोर्डी (ता. जिंतूर) येथील रहिवासी असून नागणगाव (ता. जिंतूर) येथे कार्यरत होत्या. नागणगावला पूर्वी मंदिरात अंगणवाडी भरत असे. काही वर्षांपूर्वी अंगणवाडीसाठी नवी इमारत बांधण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पंचायतराज समितीचा दौरा निश्‍चित झाला आहे.

अंगणवाडीसंदर्भात मागील दहा वर्षांचे अहवाल, रजिस्टर, हजेरीपट तयार ठेवा, अन्यथा नोकरी जाईल, अशी सूचनावजा धमकी जिंतूरच्या एकात्मिक बालविकास कार्यालयातून त्यांना देण्यात आली. माहिती जमा करण्यासाठी लागणारा पैसा कुठून आणावा, याची त्यांना विवंचना होती, असे त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. दरम्यान, सुमित्रा राखुंडे यांचा पाच महिन्यांपासून वेतन झालेले नव्हते. त्यामुळे त्या आर्थिक विवंचनेतही होत्या.

त्यातून त्यांनी आज सकाळी आठच्या सुमारास घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बोरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. बोरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. सुमित्रा राखुंडे यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

‘प्रकरणाची चौकशी करू’
परभणी - या घटनेनंतर जिल्हा परिषदेतर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. ई. देसाई यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे, संबंधित अंगणवाडी सेविकेने कोणत्याही कार्यालयीन बाबींविषयी या कार्यालयास अथवा प्रकल्प कार्यालयास पत्रव्यवहार केलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

अंगणवाडी सेविका सुमित्रा राखुंडे यांची आत्महत्या नसून सरकारने केलेली डिजिटल हत्या आहे. याचा जाब विचारलाच पाहिजे. दहा वर्षांचा अहवाल देण्याची जबरदस्ती करणाऱ्यांवर ३०६ चा गुन्हा नोंदविण्यात यावा. एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू होत असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे मात्र सरकार दुर्लक्ष करीत आहे.
- शुभा शमीम, अंगणवाडी संघटनांच्या समन्वयक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com