बालानगरच्या मुलाचा उष्माघाताने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

बालानगर - बालानगर (ता. पैठण) येथे उष्माघाताने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 12) घडली. शंकर भागचंद घोंगडे (वय 18) असे मृताचे नाव आहे.

बालानगर - बालानगर (ता. पैठण) येथे उष्माघाताने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 12) घडली. शंकर भागचंद घोंगडे (वय 18) असे मृताचे नाव आहे.

शंकरने नुकतीच बारावीची परीक्षा दिली. शेतीकामात तो आई-वडिलांना मदत करीत असे. त्याने सोमवारी भरउन्हात शेतात मशागतीचे काम केले. सायंकाळी घरी आल्यानंतर रात्रीचे जेवण केले; मात्र रात्री उशिरा त्याला चक्कर येऊन घाम आला. थोड्या वेळाने उलट्या सुरू होऊन ताप आला. वडिलांनी त्याला तत्काळ पैठण येथील रुग्णालयात नेले; मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्याला औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंधरा दिवसांत उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची ही दुसरी घटना आहे. पंधरा दिवसांपूर्वी गावातीलच दीपाली गोर्डे (वय 17) हिचाही उष्माघाताने मृत्यू झाला होता.

दरम्यान, नागरिकांनी सकाळी अकरा ते दुपारी चारच्या दरम्यान उन्हात फिरणे टाळावे, डोक्‍यावर टोपी किंवा रूमालाचा वापर करावा. दिवसभर जास्तीत जास्त फलाहार करावा, तसेच लिंबूपाणी, उसाचा रस यासह पाणी जास्त प्यावे, असे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे.

Web Title: boy death by sunstroke