हिंगोली: मुलास पळविणाऱ्यास अवघ्या दोन तासात अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

वसमत तालुक्यातील परजना येथील वैभव विष्णू गायकवाड (वय११) हा मंगळवारी (ता.९) सायंकाळी गावात खेळत होता. मात्र रात्री उशीर होऊनही तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला होता. शेतात व नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही.

हिंगोली - वसमत तालुक्यातील परजना येथून बारा वर्षाच्या मुलास पळवून सव्वा लाखाची मागणी करणाऱ्यास पोलिसांनी बुधवारी (ता.१०) दुपारी हिंगोली येथे ताब्यात घेऊन अवघ्या दोन तासात प्रकरणाचा छडा लावला. 

वसमत तालुक्यातील परजना येथील वैभव विष्णू गायकवाड (वय११) हा मंगळवारी (ता.९) सायंकाळी गावात खेळत होता. मात्र रात्री उशीर होऊनही तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला होता. शेतात व नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. मात्र त्याच्या आईच्या भ्रमणध्वनीवर मुलगा पाहिजे असेल तर सव्वा लाख रुपये बँक खात्यात जमा करा अशी सुचना देण्यात आली. या प्रकारामुळे घाबरलेल्या श्री. गायकवाड कुटूंबियांनी आज सकाळी दहा वाजता कुरुंदा पोलिसांत तक्रार दिली. यावरून संशयीत ज्ञानेश्वर सुर्यभान कऱ्हाळे (वय२५) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला होता.

पोलिस अधिक्षक योगेशकुमार, उपाधिक्षक शशीकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदिश भंडारवार, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उदयसिंह चंदेल, कुरुंद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, उपनिरीक्षक वैभव नेटके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर इंगोले, जमादार शेख माजीद, विनायक जानकर यांच्या पथकाने शोध मोहिम सुरु केली. या मोहिमेत  ज्ञानेश्वर कऱ्हाळे याच्या भ्रमणध्वनीचे लोकेशन काढून पोलिसांनी हिंगोलीकडे कूच केली. हिंगोली येथे अकोला बायपास येथे पोलिसांच्या पथकाने ज्ञानेश्वर कऱ्हाळे यास वैभव गायकवाडसह ताब्यात घेतले आहे. दरम्यान, वैभव घाबरलेला असल्यामुळे पोलिसांना अधिक चौकशी करता आली नाही. मात्र तो सापडल्याने पोलिस यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Web Title: The boy has been arrested in just two hours in Hingoli