मानवतला रस्त्यावर वाहील्या दुधाच्या धारा..!!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

शेतकऱ्यांच्या संपाला शनिवारी (ता.तीन) परभणी जिल्ह्यात पहाटेपासूनच जोरदार प्रतिसाद मिळाला. फळे व भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकची तोडफोड, सेलू शहर बंद तर मानवत येथे टॅंकर मधील दुध रस्त्यावर सोडून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

परभणी- शेतकऱ्यांच्या संपाला शनिवारी (ता.तीन) परभणी जिल्ह्यात पहाटेपासूनच जोरदार प्रतिसाद मिळाला. फळे व भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकची तोडफोड, सेलू शहर बंद तर मानवत येथे टॅंकर मधील दुध रस्त्यावर सोडून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपूरवठा करावा, शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन लागू करावी, दुधाला प्रतिलिटर पन्नास रुपये भाव द्यावा, शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठा करावा, ठिबक व तुषार सिंचनसाठी शंभर टक्के अनुदान मिळावे या मागण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे.

शनिवारी (ता.तीन) या संपाला परभणी जिल्ह्यात हिंसक वळण लागले. पहाटे सहा वाजता ब्राम्हणगाव (ता.परभणी) येथे गंगाखेडकडून परभणीत भाजीपाला व फळे घेऊन येणारा ट्रक शेतकऱ्यांनी आडवला. यात आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रकचे नुकसान करीत भाजीपाला व फळे रस्त्यावर फेकून दिली. परभणी शहरात होणारा आठवडी बाजारही आज शेतकऱ्यांनी भरू दिला नाही. शेतकरी संपाला सेलू शहरात आज चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. आठवडी बाजार ही कडडीत बंद होता. काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. मानवत रोड (ता.मानवत) येथे आलेले दुधाचे टॅंकर अडवून शेतकऱ्यांनी ते दुध रस्त्यावर सोडून दिले.

Web Title: Breaking news Manvat news Sakal News Farmer strike