स्वच्छतागृहासमोर घेतली लिपिकाने लाच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

वेतन निश्‍चित करून ते नागपुर येथे पडताळणीसाठी पाठविण्याकरीता दोन हजार रुपयांची लाच घेताना एका वरिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
पथकाने पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृहासमोर मंगळवारी (ता.6) ही कारवाई करण्यात आली. 

जालना - वेतन निश्‍चित करून ते नागपुर येथे पडताळणीसाठी पाठविण्याकरीता दोन हजार रुपयांची लाच घेताना एका वरिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
पथकाने पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृहासमोर मंगळवारी (ता.6) ही कारवाई करण्यात आली. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून 2017 मध्ये तक्रारदार हे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले आहेत. तक्रारदार यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक नरेंद्र छगन साळुंके (वय 49) याची भेट घेतली. यावेळी सातव्या वेतन आयोगाचे वेतन निश्‍चित करून ते पडताळणीसाठी नागपूरला पाठविण्याकरीता साळुंके याने तक्रारदारांकडे दोन हजार रुपयांचा मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करून मंगळवारी (ता.सहा) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील स्वच्छतागृहासमोर सापळा लावला.

यावेळी वरिष्ठ लिपीक नरेंद्र साळुंके याला तक्रारदारांकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, गंभीर पाटील, ज्ञानेश्‍वर म्हस्के, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, श्री. खंदारे, श्री. शेख यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribe taken by the clerk