बीडमध्ये लाचखोर लिपीक अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

बीड - प्लॉटची फेरनोंद घेण्यासाठी दलालामार्फत पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एका दलालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. सहा) अटक केली

बीड - प्लॉटची फेरनोंद घेण्यासाठी दलालामार्फत पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एका दलालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. सहा) अटक केली. इद्रिस खान मुसाखान पठाण असे लिपीकाचे नाव असून अशोक गंगाधर शेजवळ असे दलालाचे नाव आहे. 

बीड तालुक्‍यातील पाली येथील तक्रारदाराच्या मुलीच्या नावाने प्लॉट आहे. मात्र, गावातील काही जणांनी तक्रारी केल्याने तलाठ्याने या जमिनीची फेरनोंद केलेली नाही. तलाठी फेरनोंद घेत नसल्याने संबंधिताने तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला. फेरनोंदीचे काम पाहणारा लिपीक इद्रिसखान मुसाखान पठाण याने फेरफार करण्यासाठी अशोक गंगाधर शेजवळ (रा. शिवाजीनगर, बीड) याच्यामार्फत पाच हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरकारी पंचाच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यानुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. अशोक शेजवळ याने फेरफारसाठीची पाच हजारांची रक्कम घेऊन तक्रारदारांना त्याच्या शिवाजीनगर भागातील घरी बोलावले. तेथे त्याने लाच स्वीकारली. तेथून तो तहसील कार्यालयात आला. त्याने इद्रिस याच्याकडे लाचेची रक्कम सुपूर्द करताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribery clerk arrested in Beed