औरंगाबाद : वधू-वरांनी लग्नात वाटली एक हजार घरटी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

पवार कुटुंबाने लग्नात 'मिशन दाणापाणी' राबवत पक्षांसाठी अन्न व पाणी असलेले सुमारे एक हजार घरट्यांचे वाटप केले. 

औरंगाबाद : लग्न सोहळ्यामध्ये एकमेकांना आहेर करण्याची पद्धत आहे. त्यावर लाखोंचा खर्चही केला जातो. मात्र येथील येथील पवार कुटुंबाने सामाजिक भान जपत पक्षी संवर्धनाचा ध्यास घेतला आहे. भीषण दुष्काळी परिस्थिती माणसाचीच जगण्यासाठी धडपड सुरू असताना त्यात पशू-पक्षांची हाल पाहण्यासाठी कोणाला वेळ नाही. त्यामुळे पवार कुटुंबाने 'मिशन दाणापाणी' राबवत पक्षांसाठी अन्न व पाणी असलेले सुमारे एक हजार घरट्यांचे वाटप केले. 

पत्रकारांना माहिती देताना कैलास पवार (वर पिता) म्हणाले, भारतीय संस्कृतीत पक्ष्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र बदलत्या वातावरणामुळे दिवसेंदिवस दुष्काळही गंभीर होत चालला आहे. त्यात पक्षी व त्यांच्या प्रजाती संकटात सापडल्या आहेत. त्यांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने घेणे आहे. भारतीय संविधानात निसर्गाची काळजी घेणे, वनसंवर्धन करून त्याची जोपासना करणे, वन्य प्राणी व वन्य संपत्तीचे जतन करणे हे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. हे मूलभूत कर्तव्य लक्षात घेऊन आज लग्न सोहळ्याप्रित्यर्थ मान्यवरांना पक्ष्यांना खाण्यासाठी दाण्याची आणि पिण्यासाठी पाण्याची भांडी देऊन 'मिशन दाणापाणी'मध्ये सामील करून घेण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. पक्ष्यांसाठी आम्ही संकेत व मोनिका यांच्या लग्नाच्या सोहळ्यानिमित्त हा अनोखा पायंडा पाडत आहोत. घरटे वाटप झाल्यानंतर कैलास एन. पवार यांचे चिरंजीव संकेत व उद्योजक नामदेव खराडे यांची कन्या मोनिका यांनी सातफेरे घेतले. 

Web Title: The bride and groom gave thousand bird nest as return gifts to guests on their wedding